स्नेहा माेरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील वर्षी मार्च महिन्यात राज्यासह मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. त्यानंतर, कोरोनाचे संकट अचानक आल्याने सरकारी, खासगी आणि पालिका यंत्रणांवर ताण वाढला. अशा स्थितीत पूर्वीपासून आरोग्य क्षेत्राला दुय्यम स्थान दिल्यामुळे पायाभूत सेवा-सुविधांची चणचण भासू लागली. यावर तोडगा काढून राज्यासह मुंबईत तात्पुरती कोविड केंद्रे उभारण्यात आली. त्यानंतर तीव्र संक्रमण काळात या केंद्रांनी संसर्ग नियंत्रणात मोठ्या प्रमाणात योगदान दिले.
राज्य सरकारने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये, सरकारी रुग्णालये, तालुका-जिल्हा रुग्णालयांच्या मूलभूत सेवासुविधांकडे पूर्वीपासून लक्ष न दिल्याने येथील आरोग्यसेवा क्षेत्राचा मोठा ताण मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांवर येताे. कोरोनामुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाल्याने कोविड केंद्रांची उभारणी करण्यात आली. त्याचप्रमाणे, शहर उपनगरातील मोकळ्या इमारती, हाॅटेल अशा वास्तू विलगीकरण केंद्रांसाठी निश्चित करण्यात आल्या. यामुळे पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये खाटांच्या उपलब्धतेचा निर्माण झालेला प्रश्न सुटण्यास मदत झाली.
कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात कोविड केंद्रांमध्ये एकाच वेळी उपचार, विलगीकरण कक्ष, चाचण्या, अहवाल अशा सर्व प्रकारच्या सोयी करण्यात आल्याने संसर्ग आटोक्यात ठेवण्यास मदत झाली. त्यानंतर मार्च ते सप्टेंबर या काळात कोरोनाचे तीव्र संक्रमण होते. अशा स्थितीत रुग्णालयांसह कोविड केंद्र अहोरात्र कार्यरत असल्याने ऑक्टोबरमध्ये संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आले. त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा १५ फेब्रुवारीनंतर कोरोनाने डोके वर काढल्याने शहर, उपनगरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पुन्हा एकदा आराेग्य क्षेत्र संसर्ग राेखण्यासाठी सज्ज झाले आहे.
* ऐन कोरोना काळात या कारणांमुळे व्यवस्थेवर ताण
- आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष, निधीची कमतरता.
* रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुसज्जतेकडे दुर्लक्ष
* आरोग्यसेवांचे दर महागणे, पुरेसे मनुष्यबळ नसणे
* आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांचा अभाव
* आरोग्याच्या आपत्कालीन साथीची पूर्वतयारी आवश्यक
शहरातील टाळेबंदीला एक वर्ष उलटून गेले, यादरम्यान मागील वर्षभरात आरोग्यसेवा क्षेत्राच्या व्यवस्थापनात मंदगतीने का होईना पालिका व राज्य सरकारने प्रगती केली. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता कुठल्याही आरोग्यविषयक आपत्कालीन साथीविषयी यंत्रणांची पूर्वतयारी असणे आवश्यक आहे. भविष्यात अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान, रुग्णालय-आऱोग्य केंद्राची सुसज्जता, परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा पोहोचविणे अशा सर्व बाबतींत परिपूर्ण असणे आवश्यक आहे. आताही कोरोनाची दुसरी लाट येऊ घातली आहे, याला न घाबरता लढण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. लसीकरण मोहिमेनेही वेग घेतला आहे. लसीकरणानंतरही निष्काळजीपणा न करता कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन गरजेचे आहे.
- डॉ. राहुल पंडित, राज्य कोरोना टास्क फोर्स
----------------------