कोरोनाबाधितांचा आकडा सात हजारा पार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात एसटीतील कोरोनाबाधितांचा आकडा ७ हजारांहून अधिक झाला आहे. तर कोरोनामुळे १८० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २३,७५६ कर्मचाऱ्यांनी काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतली.
एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना काळात सेवा देताना राज्यातील एकूण ७,२३९ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १८० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ५,५७० कर्मचारी उपचार घेऊन कामावर रुजू झाले आहेत. अजूनही १,४९१ एसटी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे. कोरोना रुग्ण वाढत असतानाही एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना मास्क, सॅनिटायझर मिळत नाही. कोरोना वाढत असल्याने प्रवाशांच्या तापमानाची तपासणी करायला हवी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून हाेत आहे.
* वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन
एसटीतील काेराेनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कामगार अधिकारी हे या समन्वय कक्षाचे अध्यक्ष असतील, तर आस्थापना शाखेतील पर्यवेक्षकीय अधिकारी, वाहतूक शाखेतील पर्यवेक्षकीय अधिकारी, यांत्रिक शाखेतील पर्यवेक्षकीय अधिकारी हे या कक्षाचे सदस्य असतील. ही समिती एसटीतील काेराेनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना बेड, ऑक्सिजन आणि रुग्णवाहिका मिळवून देण्यास मदत करतील.
----------------------