कोरोनामुळे ११ दिवसांत तब्बल ३०० हून अधिक ज्येष्ठांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 06:30 AM2020-09-20T06:30:27+5:302020-09-20T06:31:00+5:30

मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा वाढू लागला आहे. शहर, उपनगरात प्रत्येक दिवशी हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होते आहे.

Corona kills more than 300 seniors in 11 days | कोरोनामुळे ११ दिवसांत तब्बल ३०० हून अधिक ज्येष्ठांचा मृत्यू

कोरोनामुळे ११ दिवसांत तब्बल ३०० हून अधिक ज्येष्ठांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा ज्येष्ठ नागरिक हा सुरुवातीपासून संवेदनशील गट आहे. ज्येष्ठ आणि अतिजोखमीचे आजार असलेल्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याचे, तसेच त्यात त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. मुंबईत गेल्या ११ दिवसांत ६० वर्षांवरील तब्बल ३१८ ज्येष्ठांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा वाढू लागला आहे. शहर, उपनगरात प्रत्येक दिवशी हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होते आहे. यात ज्येष्ठ नागरिक व दीर्घकालीन आजार असणाऱ्या नागरिकांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ७ ते १७ सप्टेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत ३१८ ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला. या कालावधीत ४० ते ६० वयोगटांतील ११९ जणांचा मृत्यू झाला. यात दीर्घकालीन आजार असलेल्या काही रुग्णांचाही समावेश आहे.


मुंबईत १७ सप्टेंबरला कोरोनाने ४३ जणांचा मृत्यू झाला. यात ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या २८ होती, तर ४० ते ६० वयोगटांतील १३ जण होते. त्यामुळे कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घरातील ज्येष्ठ नागरिकांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसेच तातडीने करोना चाचणी करून घ्यावी, त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल, असे पालिकेने स्पष्ट केले.


घरोघरी जाऊन तपासणी
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत पालिकेने घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नागरिकांची आॅक्सिजन पातळी तपासून त्याचा अहवाल तयार करण्यात येत आहे. संशयित आढळल्यास त्याला तातडीने कोरोना काळजी केंद्रात दाखल करण्यात येत असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

Web Title: Corona kills more than 300 seniors in 11 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.