विमान दुरुस्ती विभागातील अभियंत्यानेही गमावला जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एअर इंडियाच्या दोन कर्मचाऱ्यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यात मुंबईस्थित वरिष्ठ वैमानिक कॅ. अमितेश प्रसाद (५७) आणि विमान दुरुस्ती विभागातील अभियंता जॉन्सन तिर्की (४१) यांचा समावेश आहे.
कॅ. प्रसाद हे एअर इंडियाच्या बोईंग ७७७ या प्रकारातील विमानाचे कमांडर होते. कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना सायन येथील के. जे. सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, अभियंता जॉन्सन तिर्की यांचेही रविवारी कोरोनामुळे निधन झाले. ते कोलकाता येथील एअर इंडियाच्या विमान दुरुस्ती विभागात कार्यरत हाेते.
कोरोनाकाळात सुरुवातीपासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा दिली. ‘वंदे भारत’सारख्या अभियानाच्या यशस्वीतेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रवासादरम्यान विमान कर्मचारी असंख्य प्रवाशांच्या संपर्कात येत असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक भीती आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
................................................................