कोरोनामुळे राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येत झाली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 06:02 AM2021-11-19T06:02:49+5:302021-11-19T06:03:19+5:30
मुलांपेक्षा मुलींची संख्या लक्षणीय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून, नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा शाळाबाह्य मुलींचे प्रमाण राज्यात अधिक असल्याचे असरच्या २०२१ च्या अहवालातून समोर आले आहे. २०१८ च्या असरच्या शैक्षणिक अहवालाच्या तुलनेत यंदा शाळाबाह्य विद्यार्थ्यांची एकूण वाढ ०.६ टक्क्यांची आहे. यामध्ये शाळाबाह्य मुलींच्या प्रमाणात २०१८ च्या तुलनेत तब्बल १.२ टक्क्यांची वाढ आहे. तर शाळाबाह्य मुलांचे प्रमाण २०१८ च्या तुलनेत ०.१ टक्क्यांनी वाढले आहे. कोरोना काळात पालकांच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
प्रथम फाउंडेशन या संस्थेकडून दरवर्षी शालेय स्तरावरील शैक्षणिक स्थितीची देशपातळीवर पाहणी केली जाते. त्याआधारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा, त्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्यांचा लेखाजोखा मांडणारा ‘असर’ अहवाल प्रकाशित केला जातो. दोन वर्षांपासून देशभरातील शाळांमधून प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणाची जागा ऑनलाइन वर्गांनी घेतली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रथम फाउंडेशनने यंदा ग्रामीण भागातील परिस्थितीची पाहणी करून वार्षिक अहवाल सादर केला आहे. यात २०१८, २०२० आणि २०२१ या काळात खासगी शाळांतील पटसंख्येत घट झाली असून शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचे अहवालातून समोर आले. राज्यात शासकीय शाळांतील पटसंख्येत ९ टक्क्यांची आश्वासक चढ झाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शाळांमधून देण्यात येणाऱ्या ऑनलाइन शिक्षणापेक्षा खासगी शिकवण्यांवरील भर कोरोनाकाळात वाढल्याचे अहवालातील माहितीतून समोर आले आहे. राज्यात २०१८ मध्ये खासगी शिकवणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण १४.२ टक्के होते. ते यंदा २०.७ टक्के इतके झाले आहे. राज्याच्या शासकीय आणि खासगी शाळांतील एकूण ८९.८ टक्के विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साहित्य पोहोचल्याचे अहवालात नमूद केले आहे.
शिक्षणात वाढला पालकांचा सहभाग
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या शिक्षणातील पालकांचा सहभाग वाढल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील शासकीय शाळांतील ७१ टक्के तर खासगी शाळांतील ६८ टक्के म्हणजेच एकूण ७०.४ टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घरातून मार्गदर्शन मिळत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण हे अहवालातील प्रमाणापेक्षा कितीतरी पटींनी अधिक असण्याची शक्यता आहे. ही केवळ प्रतीकात्मक संख्या असून यात प्रत्यक्षात आणखी वाढ होऊ शकते. कोरोनाकाळातील स्थलांतर हे या शाळाबाह्यचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण आहे. याशिवाय मुलींच्या शाळाबाह्य होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोनाकाळात बालविवाहाच्या संख्येत झालेली वाढ हे आहे. याशिवाय या काळात बालमजुरीचे जे प्रमाण वाढले आहे त्याचाही परिणाम शाळाबाह्यची संख्या वाढण्यावर झाला आहे. - हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ
ऑनलाइन शिक्षण
८५.५ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोनच्या सुविधा.
२७.७ टक्के विद्यार्थ्यांना नियमित ऑनलाइन शिक्षण.
६२.७ टक्के विद्यार्थ्यांनी कधीतरी घेतले ऑनलाइन शिक्षण
१०. ३ टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून दूर
उत्पन्न गटानुसार शासकीय शाळांना प्राधान्य देणारे पालक
७५ टक्के अल्प उत्पन्न ६९ टक्के मध्यम उत्पन्न ६३ टक्के उच्च उत्पन्न