मुंबई : कोरोनामुळे अनेक व्यवसाय, हाँटेल, स्टार्टअप, प्ले स्कूल, पार्लर जीम आणि कार्यालयांना टाळे लागले. वर्क फ्राँम होमच्या संस्कृतीत वाढ झाली. त्यामुळे व्यवसायासाठी भाडे तत्वावर घेतलेल्या जागा अनेकांना डोईजड झाल्या आहेत. भाडे करार रद्द केले तरी इथले साहित्य ठेवायचे कुठे असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकतोय. त्यासाठी विशिष्ट भागांतील घरे भाडे तत्वावर घेण्याचे (सेल्फ स्टोअरेज) प्रमाण वाढू लागले आहे. तीन ते चार हजार रुपये मासिक भाड्यावर हे स्टोरेज उपलब्ध होत आहे. वाहने सुरक्षित ठेवण्याच्या जागाही त्याच किंमतीत दिल्या जात आहेत.
कोरोनाने बांधकाम क्षेत्रात प्रचंड मोठी उलथापालथ केली आहे. व्यावसायिक जागांची मागणी झपाट्याने घटू लागली आहे. या दुष्टचक्रात अनेक व्यवसायांची घडी विस्कटल्याने त्यांनी गाशा गुंडाळावा लागला आहे. परंतु, याच काळात सेल्फ स्टोअरेज सेक्टर देशात नव्याने उदयाला आले आहे. अमेरिकेत २००७ नंतर सुरू झालेल्या आर्थिक मंदीने या क्षेत्राची मुहुर्तमेढ रोवली गेली होती. कोरोना संक्रमणाच्या काळात या व्यवसायाने अमेरिकेत तब्बल ३९ बिलियन डाँलर्स (तीन हजार कोटी) उलाढाल केली आहे. युरोप, युके आणि आशिया खंडातील देशांतही आता त्याचा विस्तार सुरू झाला असून भारतात तो प्राथमिक टप्प्यावर असल्याचे अँनराँक प्राँपर्टीजच्या प्रत्यूष पांडे यांनी सांगितले.
सेल्फ स्टोअरेजमध्ये कार्यालयातील फर्निचर, साहीत्य, आँटोमोबाईलचे सुटे भाग, जीममधिल साहित्य, हाँटेलमधिल सामान आदीं ठेवण्याची व्यवस्था केली जाते. अल्प आणि दीर्घ मुदतीसाठी ही जागा उपलब्ध करून देताना कमी भाडे आकारले जाते. हे काम करण्यासाठी पाश्चिमात्य देशांमध्ये यूवर स्पेस, सेफ स्टोरेज, सेल्फ स्टोअरेज, स्टोनेस्ट स्टोरेज, आँरेंज सेल्फ स्टोअरेज यांसारख्या काही कंपन्या कार्यरत आहेत. भारतातील मुंबई, पुणे, बंगळूरू, गुरूग्राम आदी महानगरांमध्ये अशा कंपन्या आता दाखल होऊ लागल्या आहेत.