कोरोनामुळे भविष्यात आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याचा धडा; महापौरांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 02:47 AM2021-01-28T02:47:17+5:302021-01-28T02:47:49+5:30
महापालिकेतील रुग्ण सेवा अद्ययावत होतेय, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त महापौरांच्या हस्ते मुंबई महापालिका मुख्यालयात मंगळवारी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले
मुंबई : गेल्या वर्षीपासून कोरोना संसर्गाशी आपली आरोग्य यंत्रणा आणि मुंबईकर संघर्ष करीत आहेत. आता काेराेना लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, कोरोनामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेला भविष्याच्या दृष्टीने किती सक्षम व्हावे लागेल? याबाबत चांगलाच धडा मिळाला आहे, असे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त महापौरांच्या हस्ते मुंबई महापालिका मुख्यालयात मंगळवारी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोनाशी संघर्ष करताना महापालिकेला भविष्यातील आजारांच्या संकटांची जाणीव झाली आहे. महापालिका आपल्या आरोग्य सेवांचे अधिक उत्तमरीत्या अद्ययावतीकरण करीत आहे. कांजूरमार्ग येथील पालिका इमारतीमधील पहिल्या मजल्यावर कोरोनाची लस साठविण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजनांवर भर देत आहे.
भीती न बाळगता लस घ्यावी
कोविशिल्ड ही लस मुंबईमध्ये उपलब्ध झाली असून मुंबई महापालिकेतर्फे पाच टप्प्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी कुठलीही भीती आणि चिंता न बाळगता टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली
कोविड-१९ या आजाराशी आपण सर्वांनीच समर्थपणे लढा दिला. हा लढा आजही सुरू आहे. या आजाराशी लढा देताना अनेक जणांना प्राण गमवावे लागले, याबाबत दुःख व्यक्त करीत महापौरांनी मृत्युमुखी पडलेल्या कोविड योद्धा आणि नागरिकांना श्रध्दांजली वाहिली.
मालमत्ता करवाढ नाही
यावर्षी एकूण मालमत्ता करामध्ये ४० टक्के इतकी वाढ होणे अपेक्षित होते. कोविडमुळे करदात्या नागरिकांवर अधिक आर्थिक बोजा पडू नये, म्हणून करामध्ये कोणतीही वाढ न करता, मागील वर्षीप्रमाणेच मालमत्ता कर आकारण्यात येत आहे. तसेच, ५०० चौ.फूट किंवा त्याहून कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांकरिता, पालिका आकारित असलेल्या मालमत्ता करातील केवळ सर्वसाधारण कर १०० टक्के माफ करण्याचे शासन निर्णयानुसार मान्य करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.