लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनच्या काळातही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमातील कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. मात्र शून्य मृत्यू मोहिमेंतर्गत बेस्टमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यात यश येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. गेल्या ४५ दिवसांमध्ये बाधित कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बस सेवेने कोरोनाकाळात मुंबईकरांना मोठी साथ दिली. मात्र सतत नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला. दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये बसवाहक आणि चालक यांचा समावेश अधिक असल्याचे दिसून आले. तसेच शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
एकूण बाधित किती आणि किती कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, याबाबत बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांकडून वेगवेगळी आकडेवारी देण्यात येत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बेस्ट उपक्रमात शून्य मृत्यू मोहीम सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत तत्काळ निदान आणि योग्य उपचार कर्मचाऱ्यांना देण्यात आले. पालिकेच्या माध्यमातून बेस्ट उपक्रमाच्या विविध बस आगारांमध्ये अँटिजनची ५७ चाचणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत, असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
* शिबिरांमध्ये कोरोनाची लक्षणे नसलेल्या पाच हजार १९८ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ३२ कर्मचारी बाधित असल्याचे आढळून आले. यापैकी २५ कर्मचारी आता कोरोनामुक्त झाले असून सात कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.
* बस आगारांमध्ये आयोजित शिबिरात दररोज सरासरी ५०० कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येत होती. आतापर्यंत चार हजारांहून अधिक मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
* व्हिटामिन सी, डी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या एक लाख तीस हजारांहून अधिक गोळ्यांचे वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.
* अतिजोखमीच्या गटातील दोन हजार कर्मचारी आणि कमी जोखमीच्या गटातील तीन हजार कर्मचाऱ्यांना आराम देण्यात आला आहे.