कोरोनामुळे उदरनिर्वाहाचा संघर्ष खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:41 AM2020-09-21T01:41:38+5:302020-09-21T01:41:45+5:30
मुंबई महानगर प्रदेशातील गरिबांची व्यथा; हाताला काम नाही, जगणे झाले अवघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या सावटामुळे दूध किंवा त्यासारखे अतिरिक्त अन्नपदार्थ विकत घेणे आमच्यासारख्या कुटुंबासाठी अशक्य आहे. केवळ डाळ, पाण्यावर आम्ही आणखी किती काळ तग धरणार? अशी खंत नवी मुंबईतल्या तुर्भे येथील झोपडीत राहणाऱ्या जुही या मुलीने व्यक्त केली. कोरोना संकट काळात
जुहीसारखी अनेक मुले-मुली, कुटुंब जगण्यासाठी धडपडत आहेत. जगण्याचे हे भयाण वास्तव युवा संस्थेने मांडले आहे.
‘मुंबई महानगर प्रदेशातील शहरी गरिबांवर कोरोनाचा प्रभाव’ या अहवालातून अनेक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. अहवाल तयार करताना युवासंस्थेने १० शहरांमधील ३९ हजार ५६२ जणांशी संवाद साधला. यात काही बांधकाम क्षेत्रात काम करणारे, स्थलांतरितांचाही समावेश आहे. यातील काहींच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत, असे युवा संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प सहायक नामदेव गुलदगड यांनी सांगितले.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे येथे वास्तव्यास असलेली आणि गृहउद्योगातील कामगार शायमा यांनी सांगितले की, पती रोजंदारीवर काम करतात, त्यातून घर चालते. आता रोजंदारी मिळेनाशी झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. माटुंगा येथील घरकाम करत असलेल्या नसरिन यांना कामावर जाता न आल्याने वेतन मिळालेले नाही. गाठीशी पैसे नाहीत. मुले भीक मागू लागली आहेत. त्यातून काही पैसे आणि अन्न मिळते, तर भंगार आणि कचरा वेचून पैसे कमविण्याचा प्रयत्न करत असल्याचे बेघर ऋषभ याने सांगितले. तो म्हणाला, दैनंदिन वापरासाठी कर्ज काढून पैसे उभे केले. यातील अधिक रक्कम पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृहावर खर्च होते. जोगेश्वरीत झोपडीत राहणाºया शीला यांच्या म्हणण्यानुसार, नोकरी-व्यवसाय नाही. हाताला काम नाही, हे आणखी किती दिवस सुरू राहणार? आम्ही जगणारे कसे?
एकंदरच कोरोनाचा प्रादुर्भाव आणि विस्कळीत झालेले जनजीवन, यामुळे अनेकांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. उदरनिर्वाहासाठीचा संघर्ष अधिकच खडतर झाल्याचे अहवालातून निदर्शनास येते.
कोरोनापेक्षा उपाशी मरण्याची भीती अधिक
आम्हाला कोरोनाची भीती वाटते, पण त्यापेक्षाही आम्ही उपाशी मरू, याची भीती अधिक वाटते, अशी खंत मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाºया आणि घरकाम करणाºया वैशाली यांनी व्यक्त केली, तर वडाळा येथील झोपडपट्टीत राहणाºया शाजी या अपंग व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडे होती नव्हती ती बचतदेखील आता संपली आहे. हे असेच सुरू राहिले, तर जगणे अवघड आहे.