क्लेम करणारे ३७ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांवरील उपचारांच्या क्लेमने १० हजार कोटींचा पल्ला ओलांडला. गेल्या आठ महिन्यांत ६ लाख ६५ हजार रुग्णांनी उपचार खर्चांपोटी हे क्लेम दाखल केले असून, त्यापैकी ५ लाख ९ हजार रुग्णांचे क्लेम मंजूर झाले. एकूण क्लेमची रक्कम ९,९८९ कोटी असली, तरी मंजूर झालेली रक्कम ४ हजार ८०७ कोटी रुपये आहे. क्लेम करणारे ३७ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
जनरल इन्शुरन्सकडे दाखल झालेल्या आरोग्य विम्याच्या क्लेमच्या आकडेवारीचे आढावा घेतल्यास, रुग्णांनी उपचार खर्चापोटी दाखल केलेल्या क्लेमचा सरासरी आकडा १ लाख ५० हजार रुपये आहे, तर विमा कंपन्यांनी मंजूर केलेली रक्कम ९४,५०० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे उपचारांवर खर्च झालेल्या रकमेपैकी फक्त ६३ टक्के रकमेचा परतावा मिळत असल्याचे स्पष्ट होते.
कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण महाराष्ट्रात होते. त्यामुळे राज्यात उपचार घेणाऱ्या आणि त्यापोटी क्लेमची मागणी करणाऱ्या रुग्णांची संख्याही सर्वाधिक आहे. आजवर राज्यातील २ लाख ४६ हजार ५७४ रुग्णांनी परताव्यासाठी क्लेम दाखल केले असून, ती रक्कम २ हजार ९५५ कोटींपेक्षा जास्त आहे. यापैकी १ लाख ८१ हजार रुग्णांचे क्लेम मंजूर झाले असून, त्यांना विमा कंपन्यांनी १,४५९ कोटी रुपये अदा केले. राज्यातील रुग्णांवरील सरासरी उपचार खर्च १ लाख १९ हजार रुपये असून, परताव्याची रक्कम ८०,२०० रुपये आहे. राज्यातील खर्च आणि परताव्याची रक्कम ही देशातील सरासरीपेक्षा कमी असल्याचे ही आकडेवारी सांगते.
* उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत घट
ऑक्टाेबरमध्ये २ लाख ७ हजार रुग्णांचे ३ हजार ६७३ कोटींचे क्लेम दाखल झाले होते. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या घटली. परिणामी, या महिन्यात १ लाख ४६ हजार रुग्णांचे ३ हजार १६ कोटींचे क्लेम दाखल झाले. ६ लाख ६४ हजार रुग्णांपैकी ५ लाख ८ हजार जणांचे क्लेम आतार्यंत मंजूर झाले असून, १ लाख ५८ हजार क्लेम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
......................