मुंबई : मुंबईकर, आपण कोरोनाला हरविण्याच्या मार्गावर आहोत. आता मागे वळून बघायचे नाही. पुढेही मिशन झिरो पूर्ण करण्यासाठी सर्व नियमांचे पालन करूया, असे आवाहन मुंबई महापालिकेने यापूर्वी केले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिकेचेदेखील धाबे दणाणले आहेत. परिणामी मुंबईकर, आम्ही आपल्यावर नजर ठेवून आहोत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवून मिशन झिरो साध्य करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कृपया मास्कचा वापर करा, असे आवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना पुन्हा एकदा केले आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर २०० रुपये एवढी दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई ९ एप्रिल २०२० पासून नियमितपणे करण्यात येत आहे. त्यानुसार रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्येदेखील धडक कारवाई करण्यात येऊन कोविडविषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, जून-जुलै २०२० मधील स्थितीच्या तुलनेत आजही कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी कोविडचे रुग्ण वाढत असल्याने यंत्रणेने दक्ष राहणे आवश्यक आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.
-------------
- ज्या व्यक्तींना कोविडसंबंधी लक्षणे आहेत, त्यांनी आपली वैद्यकीय चाचणी निर्धारित केलेल्या ठिकाणी अगर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांकडून आवर्जून करवून घ्यावयाची आहे.
- सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना यापूर्वीच देण्यात आलेल्या सूचनांनुसार कोविडबाधितांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल हे प्रथम महापालिकेला कळविणे बंधनकारक आहे.
- बाधित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल हे चाचणी केल्यापासून २४ तासांच्या आत महापालिकेला कळविणे बंधनकारक आहे.
- खाटांची संभाव्य गरज लक्षात घेऊन २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी कार्यक्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे.
- रुग्णांच्या हातावर विलगीकरणाचे ठसे उमटविणे बंधनकारक आहे.
- गृह विलगीकरणात असलेले, लक्षणे नसलेले रुग्ण हे घरातच असल्याची खातरजमा करण्यासाठी वॉर्ड वॉर रूमद्वारे दररोज ४ वेळा दूरध्वनी करावेत.
- रुग्णांना रुग्णालयात दाखल करावयाची कार्यवाही वॉर्ड वॉर रूमद्वारेच करणे आवश्यक आहे.
- ज्या इमारतींमध्ये पाचपेक्षा अधिक कोविडबाधित रुग्ण आढळून येतील, अशा इमारती सील कराव्यात.
- विनामास्क रेल्वे प्रवास करणाऱ्यावर कारवाईसाठी ३०० मार्शल.
- विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी मार्शल्सची संख्या दुप्पट, दररोज २५ हजार जणांवर कारवाई
- खेळाच्या मैदानांवर व उद्यानांमध्येदेखील विनामास्क आढळणाऱ्यांवर कारवाई