Join us  

मॉक ड्रिलसाठी ‘तय्यार है हम’, कोरोनावर उपचार करणारी सर्व रुग्णालये होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 6:20 AM

गेल्या काही महिन्यांत झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

मुंबई :

गेल्या काही महिन्यांत झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. महापालिका, राज्य आणि देशपातळीवर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येची दखल घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  कोरोनाच्या अनुषंगाने सर्व    यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी देशातील सर्व रुग्णालयात १०, ११ एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबईतील सर्व खासगी, महापालिका आणि सरकारी रुग्णालये यांची तयारी पूर्ण असल्याचे सांगण्यात आले.  देशात इन्फ्लुएंझा ‘ए’चा उपप्रकार एच ३ एन २ हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत आहे, तसेच कोरोना रुग्णसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांनी त्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत.

मृत्युदर कमी...फेब्रुवारीच्या मध्यापासून काही राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. २५ मार्च रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये २६, महाराष्ट्रात २१.७, गुजरातमध्ये १३.९ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णवाढ होत असली तरी मृत्युदर कमी असून, उपचारासाठी रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही.

१२२ सध्या रुग्णालयात भरती असलेले रुग्ण ४८२ एच१ एन१ ३ मृत्यू३९० एच३ एन२ ५ मृत्यूमुंबईतील कोरोनावर उपचार करणारी सर्व  ३३ खासगी रुग्णालये आहेत. त्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मॉक ड्रिलच्या सूचनेबाबत माहिती आहे. तसेच सर्व रुग्णालयांना आता कशा पद्धतीने सज्ज राहावे याची पूर्णपणे माहिती आहे. आमच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील सर्व तयारी झाली आहे. आमच्याकडे मॉक ड्रिलच्या अनुषंगाने सर्व गोष्टी आहेत. काही महिन्यांपूर्वीही अशा पद्धतीने मॉक ड्रिल रुग्णालयात झाले होते.     - डॉ. गौतम भन्साळी, कोरोना कृती दल मुंबई समन्वयक 

आमचे सर्व आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना कोरोनाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने तयारी करायची याची चांगली माहिती आहे. आम्ही आमच्या सर्व रुग्णालयांना माहिती देऊन ठेवली आहे. त्यामुळे आम्ही सज्ज आहोत. सर्व गोष्टींची यापूर्वीच काळजी घेतलेली आहे.  - डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, सर जे. जे. समूह रुग्णालये 

केंद्रीय आरोग्य यंत्रणेने याबाबत पूर्वीच सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही तयारी केली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने संबंधित लोकांना सूचना दिलेल्या आहेत. सगळी यंत्रणा त्यांचे काम चोखपणे करीत आहेत.- डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या