मुंबईत कोरोना रुग्णवाढीत चढउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:10 AM2021-09-17T04:10:23+5:302021-09-17T04:10:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबईत मागील काही दिवसांमध्ये चढउतार दिसून येत आहे. गुरुवारी दिवसभरात ४४६ बाधित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबईत मागील काही दिवसांमध्ये चढउतार दिसून येत आहे. गुरुवारी दिवसभरात ४४६ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४६५४ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत १६ हजार ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मार्च २०२० पासून आतापर्यंत मुंबईत सात लाख ३६ हजार ७७० रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी ४३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण सात लाख १३ हजार ६०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना मुक्तीचे प्रमाण ९७ टक्के झाले आहे तर दिवसभरात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही रुग्णांना सहव्याधी होत्या. ६० वर्षांवरील हे दोन्ही रुग्ण पुरुष होते. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर आता ०.०६ टक्के एवढा आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १२७९ दिवस आहे.
चाचणीचे प्रमाण वाढले...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाल्यानंतर मुंबईत दररोज सरासरी ४५ हजार ते ५० हजार चाचण्या केल्या जात होत्या. मात्र रुग्णसंख्येत मोठी घट झाल्यामुळे चाचणीचे प्रमाण कमी करण्यात आले होते. मागील काही दिवसांत दररोज सरासरी २५ हजार ते २८ हजार चाचण्या केल्या जात होत्या. परंतु, आता रुग्णसंख्येत चढउतार सुरू असल्याने चाचण्यांचे प्रमाण आता वाढविण्यात आले आहे. गुरुवारी तब्बल ४४ हजार ६४९ चाचण्या करण्यात आल्या, तर आतापर्यंत ९८ लाख ४४ हजार ४८८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.