पालिका प्रशासनाचे आवाहन; नियमांची काटेेकाेरपणे अंमलबजावणी गरजेची
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णवाढीने कहर केला आहे. रुग्णसंख्या पूर्वीपेक्षा तिप्पट झाली असून, ती आणखी वाढू द्यायची नसेल आणि कोरोनाचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक व कार्यालयीन स्तरावर अत्यंत काटेकोरपणे कोविड प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी गरजेचे आहे, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, दोन महिन्यांपासून काेराेना प्रतिबंधात्मक लसही आली असून, लसीकरण वेगाने सुरू आहे; परंतु यामुळे लगेच दिलासा मिळेलच असे नाही. लसीकरणानंतरही मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे असे सर्व नियम पाळायला हवेत. रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवून काेराेनाचे समूळ उच्चाटन करायचे असेल, तर मुंबईकरांचे सक्रिय सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहनही पालिकेने केले.
* मागील वर्षभरात
- ४१ लाख ७४ हजार २५९ नागरिकांची कोरोना चाचणी
- ५३ लाख ५२ हजार ५२१ लोकांचे विलगीकरण
- दररोज १ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट
- आतापर्यंत १२ लाख ६० हजार ३८७ नागरिकांचे लसीकरण
- २ वेळा सुमारे ३५ लाख नागरिकांच्या घरी जाऊन माहिती गोळा
* नागरिकांनी स्वत:हून काेराेना प्रतिबंधात्मक नियम अंगीकारणे गरजेचे
कोरोना नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. विविधस्तरीय जाणीवजागृतीसह अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र, जगात या संसर्गजन्य आजारावर तात्काळ तोडगा असणारे औषध अद्याप सापडलेले नाही. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी आता नव्या जोमाने स्वत:हून काेराेना प्रतिबंधात्मक नियम कटाक्षाने अंगीकारणे गरजेचे आहे.
- इक्बालसिंह चहल,
आयुक्त, मुंबई महापालिका
----------
* हे करा
- रोज सकाळी शरीराचे तापमान, प्राणवायू पातळी मोजून घ्यावी.
- मास्क कटाक्षाने नियमितपणे लावा.
- चेहऱ्याला, तसेच मास्कला वारंवार हात लावू नये.
- सर्दी, खोकला असल्यास मास्क, रुमाल यांचा उपयोग करा.
- मास्क टाकून देण्यापूर्वी त्यावर सॅनिटायझर शिंपडून त्यांचे तुकडे करून नंतर कचऱ्यात टाका.
- साबणाने हात धुवा. सॅनिटायझरची लहान बाटली सोबत बाळगा.
- कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या मास्कला वेगळी स्वतंत्र खूण करा.
- कोणाशीही बोलताना एकमेकांच्या चेहऱ्याकडे थेटपणे बघू नका.
- शक्य असल्यास जेवण करताना समोरासमोर बसू नका.
- जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करा.
- झोप, व्यायाम, योग आदींद्वारे प्रतिकारशक्ती वाढवा.
- बंदिस्त वातावरण टाळावे.
- गर्दीत जाणे टाळा.
- वातानुकूलन यंत्रणेचा वापर टाळा.
- अरुंद ठिकाणी जास्त वेळ थांबू नका.
- सार्वजनिक ठिकाणी वावरताना थुंकू नका.
- घरी परतल्यावर आंघोळ करा.
- कोमट पाणी प्या, गरम पाण्याची वाफ घ्या.
- घरचे खाणे व घरचे पाणी पिणे यास प्राधान्य द्या.
- जेवणाचा डबा साबणाच्या द्रावणाने नीट धुऊन व पुसून घ्या.
- प्राणवायू पातळी मोजत राहा. त्यासाठी ऑक्सिमीटरचा वापर करा.
- थर्मामीटर, थर्मल स्क्रीनिंग गन घरात ठेवा.
- लहान मुले, ज्येष्ठ यांच्या प्रकृतीमानाकडे लक्ष द्या.
- एकत्र जेवायला बसताना समोरासमोर न बसता एका बाजूला एक याप्रमाणे बसा.
- न धुता कपड्यांचा पुन्हा वापर करू नका.
- भ्रमणध्वनीवर प्लास्टिकचे पारदर्शक आच्छादन वापरा.
- फरशी, स्वयंपाकगृह, प्रसाधनगृह स्वच्छतेसाठी निर्जंतुकीकरण द्रव्याचा उपयोग करा.
- नातेवाईक, मित्र इत्यादींकडे जाणे टाळा.
- कौटुंबिक समारंभ, पार्टी यांचे आयोजन करू नका.