Join us

नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या १ लाखांहून अधिक मुलांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:06 AM

राज्यातील आकडेवारी; दरराेजच्या नव्या बाधितांमध्ये सरासरी ७ टक्के रुग्ण ही लहान बालकेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काेरोनाच्या दुसऱ्या ...

राज्यातील आकडेवारी; दरराेजच्या नव्या बाधितांमध्ये सरासरी ७ टक्के रुग्ण ही लहान बालके

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काेरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गाचा वेग जास्त असून, तरुण, वृद्धांसोबतच लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक निरीक्षण समोर आले आहे. दररोज येणाऱ्या नव्या बाधितांमध्ये सरासरी ५ ते ७ टक्के रुग्ण ही लहान बालके असल्याचे आढळून आले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, राज्यात नवजात बालक ते दहा वर्षांपर्यंतच्या १ लाख १ हजार ८०९ बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ३.०९ टक्के आहे.

११ ते २० वयोगटात २ लाख २० हजार १०४ मुला-मुलींना कोरोना झाला असून, राज्यातील काेराेनाच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ६.०६ टक्के आहे. सर्वाधिक संसर्ग हा ३१ ते ४० वयोगटात झाला असून, ही रुग्णसंख्या ७ लाख १२ हजार २१५ इतकी आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत ती २१.५३ टक्के आहे.

पहिल्या लाटेत लहान मुलांना काेरोना होण्याचे प्रमाण कमी होते; परंतु आता हे प्रमाण वाढले आहे. काेरोनाचा नवा स्ट्रेन तीव्र स्वरूपाचा, लवकर पसरणारा आणि मृत्यूचे प्रमाण वाढविणारा आहे. पालक लहान मुलांना घराबाहेर घेऊन जातात. मोकळ्या आवारात मुलांची गर्दी जमताना दिसत आहे. मुले एकत्र खेळतात. यामुळे त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. शिवाय कोरोना विषाणूनेही स्वरूप बदलल्याचा फटका लहान मुलांना बसू लागल्याचे मत बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले.

* पालकांनी अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे

कोरोनाच्या पहिल्या लाटेत दोन टक्के मुले पॉझिटिव्ह येत होती. आता ही संख्या ७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. याचे एक कारण व्हायरसमध्ये झालेले म्युटेशन असू शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता मुले लोकांमध्ये जास्त मिसळू लागली आहेत. कामानिमित्त बाहेर असणाऱ्या मोठ्या व्यक्तींशी मुलांचा संपर्क वाढला आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मुलांमध्ये इतर वयोगटांच्या तुलनेत काेराेना मृत्यूदर फार कमी आहे. पालकांनी अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.

- डॉ. किशोर दालमिया, बालरोगतज्ज्ञ

* अशी घ्या काळजी

मुलांनी हात चांगले धुतले की नाही हे पाहावे. त्यांना साबण, कोमट पाणी आणि अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला सांगावे. तोंडाला चांगल्या प्रकारचा मास्क लावावा. आपल्या बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये. प्राण्यांपासून लांब राहावे, मिठाचे सेवन करणे टाळावे. बाहेरचे खाद्यपदार्थ घेणे टाळावे. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमालाचा वापर करावा. भरपूर पेय घेणे. भरपूर विश्रांती घ्यावी.

....................