Join us

दोन महिन्यांत ४०० हून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:06 AM

राज्यातील आकडेवारीस्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॊरोनाबधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कॊरोनाची लागण होण्याची संख्या दिवसेंदिवस ...

राज्यातील आकडेवारी

स्नेहा मोरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कॊरोनाबधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कॊरोनाची लागण होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील दोन महिन्यांत राज्यातील ४६३ निवासी डॉक्टरांना कॊरोनाची लागण झाली.

राज्यात कोरोना झालेल्या निवासी डॉक्टरांमध्ये मुंबईच्या मुख्य पालिका रुग्णालयातील जवळपास ७३ जणांचा समावेश आहे तर जे. जे रुग्णालयातील ७४ निवासी डॉक्टरांना मागील दोन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग झाला. निवासी डॉक्टर सातत्याने राज्यातील शासकीय, वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयांत अत्यावश्यक वस्तू, सामग्रीचा तुटवडा असल्याचे सांगत आहेत. दैनंदिन पातळीवर रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे मत निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी मांडले. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ड्युटीची वेळही वाढली आहे. सध्या कोविड हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांना १२ तास काम करावे लागत आहे. याशिवाय नॉन-कोविड वाॅर्डमध्येही ते सेवा देत आहेत.

* मनुष्यबळ, अत्यावश्यक सामग्रीचे व्यवस्थापन करावे!

काेरोना संसर्गाचा जोर पुन्हा वाढत असताना वैद्यकीय सेवेचा सर्वाधिक भार या डॉक्टरांवर येणार आहे. ताे विभागला जावा, मनुष्यबळाचे योग्यप्रकारे नियोजन करावे. कोविडसाठी नोंद केलेल्या रुग्णालयांवर अतिरिक्त रुग्णसंख्येचा भार येतो. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठीची खाटांची संख्या समान ठेवल्यास निवासी डॉक्टरांवर ताण येणार नाही. राज्यातील सर्व शासकीय, पालिका आणि वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सामग्रीचा तुटवडा जाणवत आहे याची यंत्रणांनी दखल घ्यावी. तातडीने अधिकचे मनुष्यबळही तयार ठेवावे, अशी निवासी डाॅक्टरांची मागणी आहे.

* शैक्षणिक अनुभवाचे नुकसान

काेरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या या डॉक्टरांना अभ्यासक्रमामध्ये थिअरीसाठी असलेले विषय शिकता आले. मात्र, प्रत्यक्ष प्रॅक्टिकलची गरज असते ती पूर्ण झालेली नाही. मागील वर्षांत दीर्घकाळ नेहमीच्या ओपीडी आणि शस्त्रक्रिया बंद होत्या. एरव्ही या माध्यमातून विद्यार्थी डॉक्टरांना वरिष्ठांसोबत काम करताना मोठा अनुभव मिळतो. संसर्गाच्या भीतीने इतर आजारांच्या रुग्णांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्याचाही परिणाम डॉक्टरांना मिळणाऱ्या शैक्षणिक अनुभवावर झाला.

रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव व निवासी डॉक्टर रुग्णसंख्या

जे. जे. रुग्णालय, मुंबई ७४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर ३८

नायर रुग्णालय, मुंबई २४

केईएम रुग्णालय, मुंबई २८

सायन रुग्णालय, मुंबई २१

डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर २४

जीएमसी, अंबेजोगाई ०९

आरजेएमसी, ठाणे ०४

बीजेएमसी, पुणे ७५

पीसीएमसी, पिंपरी ०६

व्हीडीजीआयएमएस, लातूर ०६

जीएमसी, नांदेड २०

जीएमसी, यवतमाळ २२

जीएमसी, अकोला १३

आयजीजीएमसी, नागपूर २४

जीएमसी, आरसीएमएम, कोल्हापूर ०३

एसबीएचजीएमसी, धुळे ०२

जीएमसी औरंगाबाद ६५

जीएमसी मिरज ०५

एकूण ४६३