Corona : ६ लाख पेक्षा अधिक भारतीय मायदेशी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 06:43 PM2020-07-12T18:43:55+5:302020-07-12T18:44:14+5:30
वंदे भारत मिशन, विशेष उड्डाणे, नौदलाच्या जहाजांद्वारे
मुंबई : कोरोनामुळे जगभरात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या वंदे भारत मिशन व इतर माध्यमातून जगभरातील विविध देशांतील भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत .
वंदे भारत मिशन, विशेष उड्डाणे, नौदलाच्या जहाजांद्वारे ६ लाख पेक्षा अधिक भारतीय या माध्यमातून मायदेशी परतले आहेत. कोरोनामुळे जगात अनेक ठिकाणी झालेल्या लॉकडाऊनमुळे जगभरातील विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्याचा मार्ग बंद झाला होता त्यामुळे या नागरिकांमध्ये निराशेचे व चिंतेचे वातावरण होते. मात्र केंद्र सरकारने या नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी वंदे भारत मिशन योजना राबवली. याशिवाय नौदलाच्या विशेष जहाजांद्वारे मायदेशी परतण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.
विविध आखाती देश, अमेरिका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, यासह विविध देशांत नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त गेलेले हजारो भारतीय नागरिकांना या माध्यमातून भारतात परतणे शक्य झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. या व्यवस्थेमध्ये वंदे भारत मिशन द्वारे एअर इंडिया ची विशेष विमानांची उड्डाणे करण्यात आली. केवळ भारतात आणण्याचेच काम नव्हे तर काही जणांना भारतातून इतर देशांत पाठवण्याचे काम देखील या माध्यमातून करण्यात आले.
11 जुलै ला 29 विविध विमानांतून 5746 भारतीय भारतात परतले आहेत. शारजाह, बहरीन, मस्कत, दुबई, कौलालम्पूर, नेवार्क, टोरंटो, सँनफ्रान्सिस्को, दोहा,लंडन, मनिला, शिकागो, सिंगापूर यासह विविध देशांतून रविवारी भारतात 5746 प्रवासी परतले. यापैकी मुंबईत मस्कत, नेवार्क व बिश्सकेक हून विमाने दाखल झाली व त्यामधून प्रवासी मुंबईत परतले.