लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईत ११ हजार बळी गेले होते, त्या मे २०२० मध्ये सर्वांधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर दुसऱ्या लाटेदरम्यान पाच हजार मृत्यूंची नोंद झाली, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले, पहिल्या कोरोना लाटेचा तडाखा अधिक होता. त्यामुळे सातत्याने देश-परदेशातील उपचार पद्धतींचा अभ्यास करून रुग्ण गंभीर होऊ नये, गंभीर असलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर व्हावी यादृष्टीने प्रयत्न करण्यात आला. ११ मार्च २०२० ला मुंबईत पहिल्या रुग्णांची नोंद झाली. तर मार्च महिन्यामध्ये ११३ रुग्ण आढळले; तर १५ जणांचा मृत्यू झाला.
यात १३.२७ टक्के रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आला. त्यानंतर कोरोना मृत्यूदर कमी होण्यास सुरुवात झाली. मार्च २०२१ मध्ये हा मृत्यूदर ०.३६ टक्क्यांपर्यंत आणण्यास पालिकेला यश आले; तर एप्रिल २०२१ मध्ये मृत्यूदर ०.९० टक्के नोंदविण्यात आला. त्यानंतर पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागल्यावर पुन्हा मृत्यूदरात वाढ झाली.संशयित रुग्णांची कोविड चाचणी करून त्यांचे विलगीकरण, बाधितांवर वेळेत उपचार करणे तसेच लसीकरण त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यात यश आले आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. ते म्हणाले, कोविड आता नियंत्रणात आहे; मात्र तो पूर्णपणे संपला, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे नियमांचे पालन आवश्यक आहे.