कोरोना वाढला, मुंबईच्या लोकलबाबत मोठा निर्णय होणार?; पालिका अतिरिक्त आयुक्तांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 09:02 PM2021-02-15T21:02:24+5:302021-02-15T21:03:36+5:30
Mumbai Local Train : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत (Corona) वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईच्या लोकलसंदर्भात पुन्हा एकदा महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
Mumbai Local : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईच्या लोकलसंदर्भात पुन्हा एकदा महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण तसे संकेतच मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. (Spike In Covid 19 Cases In Mumbai Govt To Take Big Decision About Mumbai Local Train)
"आपण मुंबईच्या लोकलसाठी १५ दिवसांचा कालावधी निरीक्षणासाठी ठेवला आहे. हा कालावधी येत्या २१ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येतोय. त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसारच लोकलबाबतचा निर्णय घेतला जाईल", असं सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबईत सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे लोकलबाबत नेमका काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण रुग्णसंख्या वाढत राहिल्यास काही कडक निर्णय घेतले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; अजित पवारांचे संकेत
"मुंबई महापालिका आणि आजूबाजूच्या महापालिका विचारात घेऊन त्यासंदर्भातील शिफारस व माहिती राज्य सरकारला उपलब्ध करुन दिली जाईल. त्यानंतरच पुढील निर्णय होईल", असंही काकाणी म्हणाले. यासोबतच मुंबईची लोकल सुरू झाली म्हणून रुग्ण वाढले हे एकमेव कारण आहे असं म्हणता येणार नाही. हवाई वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. मोजकी आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू होती, पण त्यांची संख्या आता वाढलेली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांनीही दिले मोठ्या निर्णयाचे संकेत
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत गंभीर आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल", असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. "राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनावर कुणीही राजकारण करू नये. अनेक नागरिक आणि ग्रामस्थ मास्क वापरत नाहीत हे घातक आहे. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून याबाबत चर्चा केली जाणार आहे", असं सांगत अजित पवार यांनी राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.