मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अद्यापही लोकलचे दरवाजे बंद आहेत. गेल्या १० महिन्यापासून सामान्य लोकांना मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करण्यावर बंदी आहे, कोणत्याही प्रकारे गर्दीमुळे कोरोना वाढू नये यासाठी राज्य सरकारने खबरदारी म्हणून लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला होता, कालांतराने लोकल सेवा अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली, आता मुंबईतील कोरोना रूग्णांचे प्रमाण कमी होत असताना सामान्यांना कधी लोकल सुरू करणार असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत, त्यावर लवकरच उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
सरकार सामान्य लोकांना लोकल प्रवास सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. मात्र त्यासाठी वेळेचे नियोजन आखण्यात येत आहे. कमी गर्दीच्या वेळी सामान्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. यात सकाळी ७ पूर्वी आणि रात्री १० नंतर मुंबईकर लोकलने प्रवास करू शकतील, कारण यावेळेत रेल्वेत तुलनेने कमी गर्दी पाहायला मिळते. सध्या सरकारकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच महिलांनाही निर्धारित वेळेत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सध्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पश्चिम रेल्वेवर १३६७ फेऱ्या चालवल्या जात आहेत, तर मध्य रेल्वेवर १७७४ लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. या आठवडाभरात लोकल सेवा सर्वसामान्यांना सुरू करण्यासाठी आढावा घेतला जात आहे, त्यामुळे निर्णय घेण्यास थोडा वेळ लागणार आहे. लोकल आणि प्लॅटफोर्मवरील गर्दीमध्ये सोशल डिसेस्टिंगचं पालन होईल का? हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी अनुत्सुक आहेत. तसेच रेल्वेदेखील गर्दीत सोशल डिस्टेंसिंगचं नियोजना केल्याशिवाय लोकल सुरु करू शकणार नाही, तर दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या निर्बंधामध्येही लोकलमध्ये गर्दी दिसत आहे आणि यातच तापमानात घट झाल्याने संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नव्या प्रस्तावानुसार सकाळी ७ पूर्वी आणि रात्री १० नंतर सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरु करण्याचा विचार होत आहे. त्याचसोबत कार्यालयांनाही त्यांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. दोन स्लॉटमध्ये श्रमिक वर्गाचा समावेश असेल, उदा: हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी, शिफ्टनुसार काम करणारे कर्मचारी, मात्र हा निर्णय घेताना कोरोना रुग्णांचा दर, मृत्यू दर या गोष्टींचा विचार केला जाईल. तसेच रेल्वे बोर्डाचीही परवानगी घ्यावी लागेल असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
यूके कोरोना स्ट्रेनचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने २५ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लावला होता, रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती, मात्र हा कर्फ्यू वाढवण्याची शक्यता कमी आहे. नाईट कर्फ्यू उद्या संपेल, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढू नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला होता असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.