कोरोनाची बाधा आणि मृत्यूंचा अति वायू प्रदूषणाशी थेट संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:06 AM2021-06-26T04:06:30+5:302021-06-26T04:06:30+5:30
संशाेधनातील निष्कर्ष; अतिप्रदूषित भागात कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाची बाधा आणि मृत्यू यांचा ...
संशाेधनातील निष्कर्ष; अतिप्रदूषित भागात कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची बाधा आणि मृत्यू यांचा अति वायू प्रदूषणाशी थेट संबंध असल्याचे एका संशोधनात आढळले असून, कोरोना विषाणू पीएम २.५ सारख्या सूक्ष्म कणांना चिकटतो, असे पुरावे आहेत. त्यामुळे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचे माध्यम मिळून हवेतून कोरोनाचा प्रसार तुलनेने अधिक होतो. वाहतूक व त्या खालोखाल औद्योगिक क्षेत्रात जास्त प्रदूषण असलेले मुंबई आणि पुणे देशातील संवेदनशील ठिकाणांपैकी असल्याचे हे संशोधन सांगते.
देशभरातील विशिष्ट विभाग संशोधनासाठी वेगवेगळ्या संवेदनशील प्रदेशांमध्ये विभागण्यात आले होते. ३६ राज्यांमधून १६ शहरांपैकी मुंबई आणि पुणे या दोन शहरांची महाराष्ट्रातून (झोन सहामध्ये मोडणारी) निवड करण्यात आली होती. संशोधनात मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळातील कोरोना प्रकरणांचे निरीक्षण करण्यात आले. राष्ट्रीय पीएम २.५ उत्सर्जनाच्या प्रमाणाचे आधारवर्ष २०१९ गृहीत धरले गेले. अति वायू प्रदूषण असलेल्या भागातील रहिवासी कोरोनाला बळी पडण्याची जास्त शक्यता आहे, असे हा संशोधन अहवाल सांगताे.
हवेत वेगवेगळ्या आकाराचे सूक्ष्म कण असतात. धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे मिश्रण असलेले हे कण हानिकारक असतात. यापैकी पीएम २.५ या छोट्या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटरहून कमी असतो. हे कण अनेक दिवस किंवा आठवडे हवेत राहू शकत असल्याने तसेच फुप्फुसात प्रवेश करू शकण्याइतके सूक्ष्म असल्यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम घडवू शकतात.
* कोण आहेत संशोधक?
संशोधकांमध्ये उत्कल विद्यापीठ, भुवनेश्वरचे डॉ. सरोज कुमार साहू, पीजी पर्यावरणशास्त्र आणि पूनम मंगराज, पीजी पर्यावरणशास्त्र, आयआयटीएम पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ गुफरान बेग आणि शास्त्रज्ञ सुवर्णा टिकले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राऊरकेलाचे भीष्म त्यागी व आयआयटी भुवनेश्वरचे व्ही. विनोज यांचा यात समावेश आहे.
* असे करण्यात आले संशोधन
संशोधकांनी देशातून वर्षभरातील सूक्ष्मकणांच्या (पीएम२.५) प्रदूषणाचे एकूण उत्सर्जन हाय रिझोल्युशन ग्रीड (१० किमी बाय १० किमी) पद्धतीने मोजले. त्यांनी उत्सर्जनाची नवीन आकडेवारीही बनवली. जिचे कोरोना प्रकरणांचे आणि मृत्यूच्या आकडेवारीसह विश्लेषण केले गेले. संशोधनाला देशभरातील १६ ठिकाणांहून गोळा केलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीचा आधार आहे.
* हवेतील प्रदूषके श्वसन संस्थेच्या आजारास कारणीभूत
हवेत जास्त प्रदूषक असतील तर त्या भागात श्वसन संस्थेचे आजार मोठ्या प्रमाणावर हाेतात. कोरोनाचे श्वसन संस्थेवर होणारे परिणाम पाहता वायू प्रदूषण आणि कोरोनाचा आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा स्पष्ट सहसंबंध असायला हवा आणि ताे आहे.
- अशोक शिनगारे, सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
* ज्वलन जास्त असलेल्या भागात काेराेना अधिक
पेट्रोल, डिझेल आणि कोळसा यांचे वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रातील ज्वलन जास्त असलेल्या भागात कोरोना प्रकरणे जास्त आहेत. वायू प्रदूषण आणि कोरोना यांच्या आरोग्यावरील परिणामांत समान दुवे आहेत. पीएम २.५ हे श्वसन संस्थेला बाधित करणारे सूक्ष्म कण आहेत.
- डॉ. सरोज कुमार साहू, संशोधक
* फुप्फुस कमजोर होण्याची भीती
महाराष्ट्रातील प्रदूषणाच्या संवेदनशील ठिकाणच्या दैनंदिन वायू प्रदूषणाचा सामना करणाऱ्या व्यक्तीचे फुप्फुस कमजोर होऊ शकते. जेव्हा मानवनिर्मित उत्सर्जन आणि कोरोना विषाणू यांची बेरीज होते तेव्हा फुप्फुसांचे नुकसान तीव्र गतीने होऊन प्रकृती जास्त खालावते.
- डॉ. गुफरान बेग, वरिष्ठ शास्त्रज्ञ
* धोक्याची सूचना
महाराष्ट्र सरकार आणि नागरिकांसाठी हा अहवाल धोक्याची सूचना आहे. वायू प्रदूषणाचे आरोग्यावरील परिणाम दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. मुंबई आणि पुण्यात स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत धोरणांच्या अंमलबजावणीवर काम करणे गरजेचे आहे.
- भगवान केशभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन
---------------------
- ५ नोव्हेंबर २०२० पर्यंत महाराष्ट्रात १७.१९ लाख कोरोना प्रकरणे नोंदवली गेली.
- मुंबईत १६५ दिवस हवेच्या खराब गुणवत्तेचे नोंदवले गेले.
- पुण्यात हवेच्या खराब गुणवत्तेचे ११७ दिवस होते.
- मुंबईत याच काळात २.६४ लाख कोरोना प्रकरणे आणि १०,४४५ मृत्यू झाले.
- पुण्यात ३.३८ लाख कोरोना प्रकरणे आणि ७,०६० मृत्यू नोंदवले गेले.
* संशोधनाचे शीषर्क
सूक्ष्म पार्टिक्युलेट मॅटर (पीएम २.५) ग्रस्त प्रदेश आणि कोरोना यांचा संबंध देशभरातील मानवनिर्मित प्रदूषणाचे स्रोत आणि हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी यांच्या आधारे स्थापित करणे, असे या संशोधनाचे शीषर्क आहेत.
..............................
............................