Join us

गणेशोत्सवावर यंदाही कोरोना साथीचे विघ्न, सरकारचे निर्बंध जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 6:54 AM

सरकारचे निर्बंध; मिरवणुका नाहीत; मंडळांची मूर्ती ४ फूट

ठळक मुद्देआरती, भजन किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही व ध्वनिप्रदूषणही होणार नाही, याची काळजी मंडळांना घ्यावी लागेल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना गृह विभागाने मंगळवारी जारी केल्या. यंदाही गणरायाची  प्रतिष्ठापना तसेच विसर्जनाच्या मिरवणुकांना बंदी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करता येणार नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती ४ फूट आणि घरगुती गणपतीची मूर्ती २ फुटांपेक्षा अधिक उंच असू नये, असेही गृह विभागाने म्हटले आहे. कोरोनासंदर्भात जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांमध्ये गणेशोत्सव काळात कोणतीही सूट दिली जाणार नाही. गेल्यावर्षीही गणपती मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा होती. गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. 

आरती, भजन किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही व ध्वनिप्रदूषणही होणार नाही, याची काळजी मंडळांना घ्यावी लागेल. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती किंवा सार्वजनिक मंडळांनी भपकेबाज सजावटी करू नयेत, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

विसर्जनाबाबतही नियमावली

n यंदा शक्यतो संगमरवरी किंवा धातूंच्या गणेश मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची असेल तर शक्यतो घरीच विसर्जन करावे. n ते शक्य नसेल तर नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी ते करावे. कोरोना, मलेरिया प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृतीचे कार्यक्रम घ्यावेत. n विसर्जनस्थळी आरती करण्याऐवजी ती घरीच किंवा मंडळाच्या ठिकाणी करावी. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाण्याचे टाळावे, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

गेल्या वर्षी मुंख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करीत रक्तदान शिबीर, आरोग्य चिकित्सा शिबीरे भरविली होती. नियम जाहीर करण्याआधी मंडळांचे मत जाणून घेणे गरजेचे होते. यामुळे गणेश भक्त व मंडळांमध्येही नाराजी आहे. सर्व नियमांचे पालन करून शासनास सहकार्य करण्याची तयारी आहे. मात्र शासनाने पारंपरिक गणेश मूर्तीला परवानगी द्यावी.        - वासुदेव सावंत, मानद सचिव,     चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ

सरकारने जाहीर केलेल्या या नियमावलीमुळे गणेशोत्सव मंडळ व मूर्तीकारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने ही नियमावली जाहीर करण्याआगोदर गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते. मात्र तसे न करता सरकारने एकतर्फी निर्णय घेतला. सरकारने गणेशोत्सव मंडळ व समन्वय समितीची बैठक आखून अंतिम निर्णय घ्यावा.    - नरेश दहिबावकर, अध्यक्ष,     बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव     समन्वय समिती

टॅग्स :गणेशोत्सवमुख्यमंत्रीगणेशोत्सव