CoronaVirus Mumbai: मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट; सहा हजारांहून अधिक नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 07:32 AM2022-01-02T07:32:16+5:302022-01-02T07:32:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असून, दिवसभरात सहा हजाराहून अधिक ...

Corona outbreak in Mumbai; More than six thousand new patients | CoronaVirus Mumbai: मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट; सहा हजारांहून अधिक नवे रुग्ण

CoronaVirus Mumbai: मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट; सहा हजारांहून अधिक नवे रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असून, दिवसभरात सहा हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांप्रमाणेच यंत्रणांसमोर पुन्हा एकदा ‘कोरोनाकाळ’ आव्हान बनून उभा ठाकला आहे. शहर उपनगरात दिवसभरात ६,३४७ रुग्णांचे निदान झाले असून, १ मृत्यूची नोंद आहे. ६,३४७ रुग्णांपैकी ५,७१२ रुग्ण लक्षणेविरहित आहेत, तर २२,३३४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

३१ डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १६,४४१ इतकी होती, यात शनिवारी सहा हजाराची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ४५१ रुग्ण बरे झाले असून, एकूण ७ लाख ५० हजार १५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ २५१ दिवसावर आला आहे. २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२८ टक्के आहे. 
शहर उपनगरात एकूण ७,९१,४५७ कोरोनाबाधित असून, मृतांचा आकडा १६,३७७ आहे.  दिवसभरात पालिकेने ४७,९७८ चाचण्या केल्या असून, आतापर्यंत १ कोटी ३७ लाख १८ हजार २४० चाचण्या केल्या. झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात १० सक्रिय कंटेनमेंट झोन्स असून, सीलबंद इमारतींची संख्या १५७ इतकी आहे. मागील २४ तासात पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २५,७१६ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

आणखी नवीन सहा ओमायक्रॉनबाधित

 राज्यात सहा ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण निदान झाले आहेत. हे सर्व रुग्ण बी.जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी निदान केले आहेत. यात पुणे ग्रामीण ३, पिपरी चिंचवड मनपा २ आणि पुणे मनपा १ इ. रुग्णांचा समावेश आहे. 
आतापर्यंत राज्यात एकूण ४६० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण निदान झाले आहेत. यापैकी १८० रुग्णांना  त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १८०६ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविले आहेत. यापैकी १०२ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

* यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

Web Title: Corona outbreak in Mumbai; More than six thousand new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.