कोरोना होऊन गेला; इतर आजारांवरील शस्त्रक्रिया कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:10 AM2021-09-16T04:10:28+5:302021-09-16T04:10:28+5:30
मुंबई : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार कमी झाल्यामुळे इतर आजारांवरील शस्त्रक्रिया आता हळूहळू पुन्हा सुरू होऊ लागल्या आहेत. अद्यापही ...
मुंबई : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार कमी झाल्यामुळे इतर आजारांवरील शस्त्रक्रिया आता हळूहळू पुन्हा सुरू होऊ लागल्या आहेत. अद्यापही कोरोना संसर्गाचा धोका कायम असल्याने सर्वसामान्य शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत. कोरोनाचा प्रसार सुरू होण्यापूर्वी पालिकेच्या प्रत्येक मोठ्या रुग्णालयात दररोज अत्यावश्यक व सर्वसामान्य तीनशे शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. कोविड काळात अत्यावश्यक शस्त्रक्रिया तेवढ्याच केल्या जात होत्या. अन्य नियमित शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना वाट पाहावी लागत आहे. कोरोनाचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याने दररोज सरासरी ७० टक्के शस्त्रक्रिया होत आहेत.
कोरोनाचे एकूण रुग्ण - ७३६२८४
बरे झालेले रुग्ण - ७१३१७४
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ४६०२
कोरोनाचे बळी - १६०३७
दीड महिना वाट पाहा...
कोरोनाची लागण होऊन त्यातून बरे झालेल्या रुग्णाची पुन्हा एखादी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्यास किमान सहा आठवडे म्हणजेच दीड महिने वाट पाहण्याची सूचना डॉक्टर करतात. विशेष करून अति रक्तस्राव होण्याची शक्यता असलेल्या शस्त्रक्रिया, जास्त वेळासाठी भूल द्यावी लागणे अथवा शरीरातील महत्त्वाचे अवयव काढताना अशा महत्त्वाच्या शस्त्रक्रिया दीड महिन्यांच्या कालावधीनंतर करण्यात येते.
इमर्जन्सी शस्त्रक्रिया...
* ऑपरेशन थिएटरमध्ये असलेले डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी एन-९५ मास्क लावतात. पीपीई किट घालून असतात.
* अत्यावश्यक, मात्र २४ तासांचा कालावधी असलेल्या शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची चाचणी करण्यात येते.
प्लॅन शस्त्रक्रिया...
* शस्त्रक्रियेपूर्वी रुग्ण व कुटुंबातील व्यक्तीने कुठे प्रवास केला? रुग्ण अथवा कुटुंबातील व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला अथवा आणखी काही आजार आहे का? याची माहिती घेण्यात येते.
* अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. रुग्ण बाधित आढळून आल्यास शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येते.
जिल्हा शल्य चिकित्सकांचा कोट
कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात आहे. त्यामुळे बहुतांशी रुग्णालयांत अन्य आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)