लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या ११ महिन्यांत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मुंबईत ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेले तीन दिवस मुंबईत एक हजाराच्या वर रुग्ण आढळून आले होते. त्यात शनिवारी किंचितशी घट होऊन रुग्णसंख्या एक हजाराच्या आत आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी २४९ दिवस इतका आहे. दिवसभरात ९८७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख २४ हजार ८६४ वर पोहोचला आहे. तर चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११ हजार ४६५ वर पोहोचला आहे. ८०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या ३ लाख ३ हजार ३३ वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या ९४९६ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या १२ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत; तर १२७ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३२ लाख ५३ हजार ३२७ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका सर्वोपरी प्रयत्न करीत आहे. जनजागृती करीत आहे. मास्क न लावणाऱ्यांना दंड आकारत आहे. ठिकठिकाणी चाचण्या सुरू आहेत. त्यासोबतच कोरोना लसीकरण मोहिमेसाठी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत.
मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा काळ २४९ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 1:09 AM