धारावीतील कोरोना रूग्णसंख्या पुन्हा शून्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 08:03 AM2021-07-05T08:03:32+5:302021-07-05T08:04:37+5:30
मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार माहीममध्ये ७ आणि दादर येथे ही नोंद ६ झाली आहे. हा आकडा एकूण १३ आहे. मुळात धारावी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.
मुंबई: चेज द व्हायरस, मिशन झिरो, ट्रेसिंग-ट्रॅकींग-टेस्टींग- ट्रिटिंग या चतु:सूत्रीनुसार करण्यात येत असलेल्या कार्यवाहीमुळे मुंबई महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांना यश येत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे धारावी येथे रविवारी शून्य रुग्णसंख्या नोंदविण्यात आल्याचा दावा मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा केला आहे.
मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार माहीममध्ये ७ आणि दादर येथे ही नोंद ६ झाली आहे. हा आकडा एकूण १३ आहे. मुळात धारावी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. येथे झोपड्या, चाळी आणि इमारती मोठ्या संख्येने आहेत. दाट लोकवस्ती असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर कोरोना पसरला होता. मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनी आज रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे.
उत्सव, सणावर बंधने घालून गर्दी कमी करून कोरोना नियंत्रणात आणण्यात महापालिकेला यश आले आहे. धारावी आणि पश्चिम उपनगरात मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली होती. आजही कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी धारावीत सातत्याने चाचण्या होत असून, जनजागृती केली जात आहे. त्यामुळे येथे कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यात यश येत आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
धारावी पॅटर्न
दाट लोकवस्ती असलेल्या धारावीसारख्या भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या यशस्वी उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे त्या भागातील संसर्ग रोखण्यात यश आले, अशा या धारावी पॅटर्नची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. कोविडचा मुकाबला करण्यासाठी गांभीर्यने आणि पारदर्शकपणे पावले उचलली गेल्याने कोरोनावाढीचा वेग कमी आहे.
एकूण रूग्णसंख्या
धारावी : ६ हजार ९०१
दादर : ९ हजार ६९८
माहीम : १० हजार २१