Join us

CoronaVirus News: बोरीवली, मलबार हिलमध्ये वाढले कोरोना रुग्ण; गणेशोत्सवातील भेटीगाठींचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 1:46 AM

रुग्ण दुपटीचा कालावधी ६१ दिवसांवर

मुंबई : कोरोनाचा प्रसार मुंबईत नियंत्रणात आला असे वाटत असतानाच गेल्या पंधरवड्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. गणेशोत्सव काळात बाजारपेठेत नागरिकांची गर्दी आणि नातेवाइकांशी भेटीगाठी वाढल्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. त्यामुळे २५ आॅगस्ट रोजी ९३ दिवसांवर असलेला रुग्ण दुपटीचा कालावधी आता ६१ दिवसांपर्यंत घसरला आहे. तर बोरीवली, गोरेगाव, दहिसर, मुलुंड आणि मलबार हिल या विभागांमध्ये दैनंदिन रुग्णवाढीचा दर सर्वाधिक आहे.

जून महिन्यात महापालिकेने लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुंबईतील अनेक व्यवहार सुरू झाले आहेत. त्याच वेळी गणेशोत्सव काळात बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. परिणामी, दररोज सरासरी एक हजारापर्यंत असलेली रुग्णांची संख्या पुढील काही दिवस दोन हजारांवर पोहोचेल असा, अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला होता. त्यानुसारच मुंबईत अपेक्षेप्रमाणेच दररोज सुमारे १७०० ते १९०० बाधित रुग्ण आढळून येत आहेत.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ०.७५ टक्के एवढा होता. मात्र आता हाच दर १.१४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर बोरीवली विभागात रुग्णवाढीचा सरासरी दर १.६७ टक्के म्हणजे सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ गोरेगाव विभागात अचानक झपाट्याने रुग्णांची संख्या वाढली असून दररोजचा रुग्णवाढीचा दर १.५८ टक्के आहे. तसेच दहिसर, मुलुंड, मलबार हिल, पेडर रोड, कांदिवली, अंधेरी पश्चिम, वांद्रे पश्चिम, घाटकोपर, कुलाबा या विभागांमध्येही दैनंदिन रुग्णवाढीचा दर मुंबईतील सरासरीपेक्षा अधिक आहे.

1. गेल्या महिन्यापासून बोरवली विभाग हॉटस्पॉट ठरला आहे. या विभागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ४२ दिवसांवर आला आहे. गेल्या आठवड्याभरात या विभागात तब्बल १०४३ रुग्ण वाढले आहेत.2. पी दक्षिण म्हणजे गोरेगाव विभागात रुग्ण संख्येत अचानक वाढ झाली आहे. येथे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ४४ दिवसांवर आला आहे. गेल्या आठवड्याभरात या विभागात तब्बल ५८३ रुग्ण वाढले आहेत.3. आर मध्य म्हणजे दहिसर विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४७ दिवस आहे. गेल्या आठवड्याभरात या विभागात तब्बल ४३२ रुग्ण वाढले आहेत.4. टी विभाग मुलुंड परिसरात रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ४७ दिवसांचा असून गेल्या आठवडाभरात येथे ६९४ रुग्ण वाढले आहेत. तर मलबार हिल, पेडर रोड या उच्चभ्रू वस्तीत आठवड्याभरात ६६४ रुग्ण वाढले असून रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ४९ दिवस एवढा आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई