Join us

कोरोना रुग्णांना महापालिकेच्या ‘मुंबई मैत्री’चा आधार; उपचार घेणाऱ्यांची नियमित विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 1:41 AM

रुग्ण व त्याचे कुटुंबीय मानसिक तणावात असल्याचे जाणवल्यास त्यांना मानसिक आरोग्यविषयक समुपदेशकांशी व भावनाविषयक तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुविधा १८००-१०२-४०४० या क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात येते.

मुंबई : होम क्वारंटाइन असलेल्या कोरोना बाधित रुग्णांचे आरोग्य व औषधोपचाराबत नियमित आढावा महापालिकेच्या ‘मुंबई मैत्री’च्या माध्यमातून घेतला जात आहे. खाजगी सहकारी सहभागी तत्त्वावर जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत २१ हजार २५० रुग्णांबरोबर संपर्क साधण्यात आला आहे. यापैकी १४ हजार ८०० रुग्णांवरील उपचार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पालिका कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांमार्फत घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांची नियमित विचारपूस होत असल्याने त्यांनाही आधार मिळत आहे.

संशयित रुग्ण, कोरोनाची लक्षणे नसलेले अथवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोणताही गंभीर त्रास होत नसल्यास होम क्वारंटाइन होण्याची मुभा आहे. मात्र १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीमध्ये त्यांच्या प्रकृतीवर तसेच औषधोपचारावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असते. त्यामुुळे महापालिकेने पुढाकार घेऊन जुलै महिन्यात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीची मुंबई मैत्री ही संकल्पना राबविण्यात आली. या प्रकल्पातून मिळालेली शिकवण आणि अनुभव यांची पुढील तीन महिन्यांतील माहिती इतर शहरांना आणि जिल्हा प्रशासनांना कळविण्यात येईल, असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.‘मुंबई मैत्री’द्वारे असा मिळतो रुग्णांना आधाररुग्ण व त्याचे कुटुंबीय मानसिक तणावात असल्याचे जाणवल्यास त्यांना मानसिक आरोग्यविषयक समुपदेशकांशी व भावनाविषयक तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुविधा १८००-१०२-४०४० या क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात येते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या, परंतु सात दिवसांसाठी होम क्वारंटाइनची शिफारस करण्यात आलेल्या रुग्णांच्या स्तरावरदेखील या प्रकल्पांतर्गत नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे. दूरध्वनी पाठपुरावादरम्यान रुग्णामध्ये कोविड लक्षणे असल्याचे निदर्शनास आल्यास नियंत्रण कक्षाला कळविले जाते. आजार असलेल्या रुग्णांवर लक्ष दिले जाते.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका