कोरोना : अव्वाच्या सव्वा बील आकरणाऱ्या खासगी रुग्णालयांना लोकप्रतिनिधींचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 04:07 PM2020-11-10T16:07:20+5:302020-11-10T16:07:40+5:30
Corona News : उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाचे प्रमाण आटोक्यात येत असल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून केला जात असतानाच दुसरीकडे कोरोना रुग्णावर उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. परिणामी खासगी रुग्णालयाकडून आकारल्या जाणा-या अव्वाच्या सव्वा दरांना चाप बसाव म्हणून आता लोकप्रतिनिधीदेखील आवाज उठविणार आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेने यापूर्वीपासूनच अशा खासगी रुग्णालयांना दणका दिला असला तरी आता लोकप्रतिनिधींकडून हा विषय पालिका सभागृहात मांडला जाणार आहे.
मुंबई महापालिकेतील विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी रुग्णालयाच्या दर्शनी भागात वैद्यकीय शुल्कचे दर पत्रक लावण्यात यावे. नियमांचे उल्लंघन करणा-या खासगी रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याबाबत ठराव सभागृहात केला जाणार आहे. मुंबई महापालिका अशा खासगी रुग्णालयांवर कारवाई करत असूनदेखील अद्याप अशा घटना कमी झालेल्या नाहीत. परिणामी आता लोकप्रतिनिधींनी आवाज उठविल्यावर तरी रुग्णांना न्याय मिळले, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. आता पर्यंत अशा अनेक कारवाया केल्या गेल्या असून, महापालिकेने खासगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेतल्या आहेत. या खाटांवर उपचार घेणा-या रुग्णांकडून निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे. मात्र खासगी रुग्णालये अवाजवी आकारणी करीत आहेत.
----------------------
कारवाई
जून महिन्यात २६ रुग्णालयांतील १३४ तक्रारी निकालात काढण्यात आल्या. सर्व तक्रारींमधील मूळ आकारणीची एकूण रक्कम १ कोटी ६१ लाख ८८ हजार ८१९ रुपये होती. वास्तविक रक्कम ही १ कोटी ३८ लाख ४६ हजार ७०५ रुपयांपर्यंत कमी झाली.
जुलै महिन्यात ३७ रुग्णालयांतील ६२५ तक्रारी सोडविण्यात आल्या. तसेच अन्य ४९० तक्रारींमध्ये देखील कार्यवाही करण्यात आली. अशा एकूण १ हजार ११५ तक्रार प्रकरणात कार्यवाही केल्याने सुमारे १ कोटी ४६ लाख ८४ हजार रुपये रकमेची परतफेड करण्यात आली आहे.
----------------------
रुग्णांकडून निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे. मात्र खासगी रुग्णालये अवाजवी आकारणी करीत आहेत. परिणामी यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी २ अधिका-यांची नियुक्ती ही खासगी रुग्णालयांसाठी करण्यात आली.
एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत तक्रार करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय महानगरपालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयासाठी ज्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकार्यांकडे ईमेलद्वारे थेटपणे तक्रार नोंदविता येते.