कोरोनाकाळात दर्शकांचा ओढा ‘ओटीटी’कडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:10 AM2021-08-12T04:10:09+5:302021-08-12T04:10:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाकाळ मनुष्यप्राण्यांसह उद्योग जगताला मानवत नसला तरी ओटीटी प्लॅटफॉर्म मात्र याकाळात सुखावून निघाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाकाळ मनुष्यप्राण्यांसह उद्योग जगताला मानवत नसला तरी ओटीटी प्लॅटफॉर्म मात्र याकाळात सुखावून निघाला आहे. गेल्या काही महिन्यांत ओटीटीचे प्रस्थ कमालीचे वाढल्यामुळे केबल व्यवसायाला जोरदार फटका बसला आहे. ग्राहकसंख्या कमी झाल्याने जवळपास ४० टक्के नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती केबल व्यावसायिकांनी दिली.
मुंबईत एकेकाळी केबल टीव्हीचे जाळे सर्वाधिक होते. मोठमोठ्या इमारतींपासून, निवासी संकुले, चाळी, झोपडपट्ट्यांमध्ये केबलशिवाय अन्य कोणा पुरवठादाराला प्रवेश नसायचा. डिश टीव्हीच्या आगमनामुळे केबल व्यावसायिकांसमोर स्पर्धा निर्माण झाली. मात्र, जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी आपले महत्त्व टिकवून ठेवले. परंतु, जिओ फायबरने दूरसंचार कंपन्यांप्रमाणे केबल व्यवसायातही धमाकेदार इन्ट्री करीत केबल क्षेत्रात आव्हान निर्माण केले. त्यामुळे शहरी क्षेत्रात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत ग्राहकसंख्या कमी झाली.
त्यात कोरोनाकाळात ‘ओटीटी’ने नवे आव्हान निर्माण केले आहे. चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण थांबल्यामुळे टेलिव्हिजनवर तेच तेच कार्यक्रम दाखविले जाऊ लागले. त्यामुळे दर्शक कंटाळले. जवळपास ४ ते ५ महिने ही स्थिती कायम असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मनी त्याचा फायदा घेतला. दर्शकांनी न पाहिलेले जगभरातील नवे-जुने चित्रपट, कार्यक्रम, मालिका एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत ग्राहकसंख्या वाढवली. नवा कंटेंट मिळत असल्याने दर्शकांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. आता ओटीटीची सवय झाल्याने ग्राहक पुन्हा केबलकडे वळताना दिसत नसल्याचे शिव केबल सेनेचे सरचिटणीस विनय पाटील यांनी सांगितले.
डिश टीव्ही, जिओ फायबर आणि आता ओटीटीमुळे केबल व्यवसायाचे जवळपास ४० ते ४५ टक्के नुकसान होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे हा व्यवसाय अर्थसंकटात सापडला आहे. केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी यातून सावरण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
......
बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे केबल व्यावसायिकांना ट्रान्सफॉर्मेशन करावेच लागेल. फायबर, ओटीटी यांना टक्कर देण्यासाठी स्वतःची सक्षम यंत्रणा उभारावी लागेल. आम्ही त्यादिशेने पावले टाकत आहोत.
- विनय पाटील, सरचिटणीस, शिव केबल सेना