कोरोनामुळे मानसिक आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 07:07 PM2020-04-05T19:07:49+5:302020-04-05T19:08:30+5:30

नैराश्य आणि ओसीडी रूग्णांमध्ये होतेय वाढ

Corona poses a threat to mental health | कोरोनामुळे मानसिक आरोग्य धोक्यात

कोरोनामुळे मानसिक आरोग्य धोक्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोना व्हायरसमुळे देशातील नागरिकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या भितीने मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत अनेक लोक नैराश्याच्या आहारी जाऊ लागले आहेत. मीरारोड येथील वोक्हार्ड रूग्णालयातील मानसोपचार विभागात गेल्या महिन्याभरात ऑब्सेसिव्ह कंम्पल्सिव्ह डिर्साडर (ओसीडी) या आजाराच्या रूग्णसंख्येत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली आहे.

सध्या प्रत्येक बातम्या, वाहिन्या असो वा व्हॉटसअँप किंवा फेसबुकवर कोरोना...रस्त्यावर फिरलो तरी कोरोना होईल घरी बसा...आणि घरी बसलो तरी कोरोनाच्याच चर्चा...संपूर्ण देशाला गुंडाळून टाकलेल्या या कोरोना विषाणूने आता प्रत्येक नागरिकाचे आयुष्य कोरोनामय करून टाकले आहे. कोरोनाची धास्ती इतकी वाढलीय की आपल्यालाही कोरोना होईल, या भितीने अनेक लोक आता मानसिक समस्या उद्भवू लागल्या आहेत.
मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जसा वाढतोय, तसा नागरिकांच्या वागणुकीवर परिणाम दिसून येत आहे. लॉकडाऊननंतर लोक घरीच राहिल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. हाताला काम नाही, आर्थिक संकट, जीवनशैलीत बदल आणि मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी चिंतेपायी अतिप्रमाण हात धुवते जात आहेत. गरज नसतानाही एखादी गोष्टी प्रमाणापेक्षा जास्त करणे हा एक मानसिक आजार आहे. वैद्यकीय भाषेत या आजाराला ओसीडी असे म्हणतात. या रूग्णांमध्ये आता वाढ होताना दिसून येत आहे.

यासंदर्भात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सोनल आनंद म्हणाल्या कोरोना हा आजाराने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतातही आता रूग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. या आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे आपल्यालाही या आजाराची लागण होईल? अशी भिती लोकांना सतावू लागली आहे. एकमेकांच्या संपर्कात यायचे नसल्याने मनातील ही भावना कोणासमोरही व्यक्त करता येत नसल्याने लोकांमध्ये नैराश्य वाढतय. त्यामुळे सध्या मनोरूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

डॉ. सोनल पुढे म्हणाल्या , गेल्या महिन्याभरात नैराश्य आणि ओसीडी (ऑब्सेसिव्ह कंमम्पल्सिव्ह डिर्साडर) या आजाराच्या रूग्णसंख्येत २० ते २५ टक्क्यांनी वाढ आहे. हा मंदगतीने वाढणारा मानसिक आजार आहे. या मनोविकारात व्यक्ती अती स्वच्छता पाळतात. त्यांना भिती असते आपल्याला जंतुसंसर्ग होईल, त्यामुळे आपल्याला त्रास होईल या भितीने व्यक्ती काळजी घेत असते. यात, वारंवार हात धुवणे, आंधोळ करणे, कपडे बदलणे, वारंवार वस्तूंची तपासणी करणे, अशी लक्षणे या लोकांमध्ये दिसून येत आहेत. याशिवाय बहुतेक रूग्णांमध्ये उदासिनपणा, बैचैनी, काम करायला कंटाळा येणं, खूप वेळ विचार करण्यात घालवणे, नैराश्य अशा तक्रारी घेऊन येत आहेत. असे असताना अनेक लोकांना  मानसिक आजार झाला आहे याची जाणीवही झालेली नसते.
...................................
 

मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे करा
•         कोरोनाविषयीचा वृत्तांत, संदेश, पोस्ट वाचताना सजग राहा
•         दिवसभरात आपल्याला काय काम करायचे आहे, याचा आराखडा तयार करा
•         तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल अशा बातम्या वाचणे, पाहणे टाळा
•         नियमित व्यायाम करा, ध्यान करा सकारात्मकता वाढेल
•         हात किती वेळा धुवावेत, याकडेही लक्ष द्या
•         संसर्ग टाळण्यासाठी आपण हात धुवत आहोत की आपल्या समाधानासाठी हे सुद्धा पहा
•         सोशल मिडियापासून दूर राहून टीव्हीवरील मनोरंजनपर कार्यक्रम पहा
•         एखाद्या व्हॉट्सअँप ग्रुपवर कोरोनाची चर्चा होत असल्यास त्यातून बाहेर पडा
•         मानसिक आरोग्याबाबत तक्रारी असल्यास तातडीने मानसोपचार तज्ज्ञांना संपर्क साधा

Web Title: Corona poses a threat to mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.