कोरोनाग्रस्त आजोबा आयसीयूतून गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 07:02 AM2020-06-01T07:02:32+5:302020-06-01T07:02:42+5:30
केईएम रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, पोलिसांत हरवल्याची नोंद
मुंबई : ताप वाढल्याने ७० वर्षीय आजोबांना केईएम रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांनी कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच, अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, उपचार सुरू असतानाच १९ मेपासून आजोबा बेपत्ता असल्याचा कॉल कुटुंबीयांना आला. अखेर काहीच थांगपत्ता न आल्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.
काळाचौकी परिसरात आजोबा नातेवाइकांसोबत राहण्यास आहेत. त्यांना उच्च रक्तदाबाचाही त्रास आहे. घणसोलीला राहणाऱ्या त्यांच्या जावयाने दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी आजोबांना केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथे कोरोना चाचणीचा अहवाल येताच १६ तारखेला त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले. कुटुंबीयांनाही क्वॉरंटाइन करण्यात आले. कुटुंबीय सतत त्यांच्या संपर्कात होते. १८ तारखेला त्यांची प्रकृती ढासळत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल असे सांगण्यात आले. एकीकडे वडील लवकर बरे होऊन घरी यावेत म्हणून प्रार्थना सुरू असताना, १९ तारखेला ते नाहीसे झाल्याच्या कॉलने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
शोध सुरू असताना, अशाच प्रकारे पळून गेलेली एक व्यक्ती पुन्हा रुग्णालयात दाखल झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून या व्यक्तीचा मृतदेह दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो मृतदेह आजोबांचा नसल्याचे सांगताच पुन्हा शोध सुरू झाला.
रुग्णाकडे दुर्लक्ष होणे चुकीचे
एकीकडे १० दिवसांहून अधिक दिवस झाले असतानाही त्यांचा शोध न लागल्याने शनिवारी त्यांच्या कुटुंबीयांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हरविल्याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. आजोबांना रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे ते सध्या कुठे आणि कुठल्या अवस्थेत आहेत? या विचाराने चिंता वाढत आहे. आणि अशा प्रकारे रुग्णाकडे दुर्लक्ष होणे चुकीचे असल्याचेही कुटुंबीयांनी नमूद केले आहे.