मुंबईत कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण ५ टक्क्यांच्या खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:08 AM2021-01-03T04:08:03+5:302021-01-03T04:08:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हळूहळू मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होते आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण पाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हळूहळू मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होते आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आले आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात शहर, उपनगरात कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण ४.५९ टक्क्यांवर आले आहे. २८ डिसेंबर रोजी शहर, उपनगरात सर्वांत कमी म्हणजे ३.८ पॉझिटिव्हिटी दर असल्याची नोंद झाली. त्यादिवशी १३ हजार ८६० चाचण्या करण्यात आल्या, त्यातून केवळ ५३७ रुग्णांचे निदान झाले.
१ ते २९ डिसेंबर या कालावधीत ४ लाख ३ हजार कोरोना चाचण्या पार पडल्या. यात १९ हजार ७४४ रुग्णांचे निदान झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांनुसार, सलग दोन आठवडे पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या खाली राहिल्यास केंद्र व राज्य शासनांच्या सूचनेनुसार राज्यासह शहरांत आणखी सेवासुविधा अनलाॅक करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात पॉझिटिव्हिटी दर २० ते ३० टक्क्यांच्या दरम्यान होता, फेब्रुवारी महिन्यात हे प्रमाण १२.४२ टक्के होते. मात्र, राज्य शासन व पालिका प्रशासन या यंत्रणांच्या प्रयत्नानंतर हे प्रमाण कमी झाले आहे.
२० डिसेंबर रोजी २२ हजार ६५४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या, तर २२ डिसेंबरला हे प्रमाण २५ हजार १३८ वर पोहोचले. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, पालिकेकडून दिवसाला सरासरी १६ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी तसेच फेरीवाले, दुकानदार आणि किरकोळ विक्रेत्यांच्याही चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र, तरीही शहर उपनगरातील पॉझिटिव्हिटी दर कमी असल्याचे दिसून आले आहे.