कोरोनाचा प्रसार इमारतींमध्येच अधिक, ९० टक्के कोरोनाबाधित इमारतींतील रहिवासी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 10:09 PM2021-03-10T22:09:32+5:302021-03-10T22:10:10+5:30

१ फेब्रुवारीपासून मुंबईतील रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यात आली. मात्र लॉक डाऊन शिथिल झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी वाढली. (CoronaVirus)

Corona prevalence is highest in buildings, with 90 percent | कोरोनाचा प्रसार इमारतींमध्येच अधिक, ९० टक्के कोरोनाबाधित इमारतींतील रहिवासी

कोरोनाचा प्रसार इमारतींमध्येच अधिक, ९० टक्के कोरोनाबाधित इमारतींतील रहिवासी

googlenewsNext

 
मुंबई- कोरोनाचा प्रसार दाट, अरुंद वस्ती आणि झोपडपट्ट्यांपेक्षा इमारतींमध्येच अधिक होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांत २३ हजार दोन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी ९० टक्के रुग्ण इमारतींमधील रहिवासी असून दहा टक्के रुग्ण झोपडपट्टीत राहणारे आहेत. त्यामुळे प्रतिबंधित इमारतींमधील नियम कठोर केले जाणार असून नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. (Corona prevalence is highest in buildings, with 90 percent)

१ फेब्रुवारीपासून मुंबईतील रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यात आली. मात्र लॉक डाऊन शिथिल झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी वाढली. परिणामी मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. दररोज सुमारे एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्याने रुग्ण वाढीचा दैंनदिन दर ०.३२ टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे बाधित रुग्णांची संख्या इमारतींमध्येच अधिक असल्याचे आढळून येत आहे. 

ही वाढ नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पुन्हा कठोर पावलं उचलली आहेत. त्यानुसार होम क्वारंटाईन व कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. याच बरोबर अशा लोकांची माहिती पालिकेला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

रुग्ण वाढ अधिक असलेल्या एम पूर्व-गोवंडी, एम पश्चिम- चेंबूर, एन- घाटकोपर, एस - भांडूप आणि टी - मुलुंड विभागांचा केंद्रीय पथकाने गेल्या आठवड्यातच आढावा घेतला. त्यानुसार महापालिकेने कोविड संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी पावले उचलली आहेत. पाचपेक्षा जास्त बाधित रुग्ण असलेल्या इमारतींमध्ये सूचना फलकांवर संबंधित घराचा आणि मजल्याचा क्रमांक दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच बाधित रुग्ण, त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात येत आहेत. त्याचबरोबर बाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती एकाच घरात राहत असतील आणि त्यांच्याकडे स्वतंत्र खोली नसल्यास त्यांना विलगीकरण केंद्रांमध्ये नेण्यात येणार आहे. असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. 

अशी घेतली जातेय काळजी -
- बाधित रुग्ण, त्याच्या कुटुंबियांनी होम क्वारंटाईन असताना मास्क वापरणे, निर्जंतुकीकरण, सुरक्षित अंतर राखावे. 

- बाधित रुग्ण संख्या अधिक असलेल्या इमारतींमधील मोलकरीण, मजूर, वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते, कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या व्यक्ती, अशा सर्वांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. अशा चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. 

- रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची, त्यांच्यात लक्षणे आढळली नाहीत तरीही, संपर्कात आल्यापासून सातव्या दिवशी चाचणी करावी. 

- होम क्वारंटाईनचे पालन करत नसलेल्या व्यक्तींना सक्तीने कोरोना काळजी केंद्र १ मध्ये स्थानांतरीत केले जात आहे. सर्व विभागातील केंद्र व्यवस्था पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. 

सील मजले - २,७६२ 
मजल्यांवर एकूण रुग्ण - चार हजार १८३ 
पाचपेक्षा अधिक रुग्ण असल्याने सील इमारती - २१४
 

Web Title: Corona prevalence is highest in buildings, with 90 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.