Join us

भाऊच्या धक्क्याला दिला कोरोनाने ‘धक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:06 AM

प्रवासी संख्या रोडावली; जलवाहतुकीवर परिणामसुहास शेलारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील जलवाहतुकीचे केंद्र अशी ओळख असलेल्या भाऊच्या ...

प्रवासी संख्या रोडावली; जलवाहतुकीवर परिणाम

सुहास शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील जलवाहतुकीचे केंद्र अशी ओळख असलेल्या भाऊच्या धक्क्याला कोरोनारूपी धक्का बसला आहे. प्रवासी संख्येत जवळपास ५० टक्के घट झाल्यामुळे येथील जलवाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे फेरीबोट व्यावसायिक चिंतेत आहेत.

लॉकडाऊनमध्ये येथील जलवाहतूक पूर्णपणे बंद होती. कोरोनाबाबतचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर हळूहळू वाहतूक सुरू झाली. डिसेंबर-जानेवारीमध्ये व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रवासी संख्येवर परिणाम होऊ लागला आहे. पूर्वी १०० प्रवासी क्षमता असलेल्या फेरीबोटीतून आधी ७० ते ८० प्रवासी प्रवास करायचे. प्रवासी येण्याची वाट पाहावी लागत नव्हती. तिकीट खिडक्यांसमोर लांबलचक रांगा लागायच्या. सुटीच्या दिवशी तर बोटींच्या फेऱ्या वाढवाव्या लागत होत्या. आता प्रवासीसंख्या प्रतिबोट ३० पर्यंत खाली आली आहे. सकाळच्या फेरीसाठी तर केवळ २-३ प्रवासी असतात; परंतु, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बोट सोडावी लागते, अशी व्यथा व्यावसायिकांनी मांडली.

... तर फेरीबाेट व्यावसायिक काेलमडून पडतील

गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मुंबईवर पुन्हा लॉकडाऊनचे संकट घोंघावत आहे; पण सरकारने लॉकडाऊन न करता अन्य काहीतरी तोडगा काढावा. जलवाहतुकीवर पूर्वीसारखे निर्बंध लावल्यास फेरीबोट व्यावसायिक कोलमडून पडतील.

- शराफत मुकादम, सरचिटणीस, मुंबई जलवाहतूक आणि औद्योगिक सहकारी संस्था.

* तोटा किती?

कोरोनापूर्वी एका फेरीबोटीमागे वर्षाला साधारण तीन लाख रुपये उत्पन्न मिळायचे. कोरोनाकाळात हेच उत्पन्न दीड लाखावर स्थिरावले. जलवाहतूक कर, बोटीची डागडुजी, चालक-वाहकांचे वेतन यांचा विचार केल्यास खर्चाचा ताळमेळ बसणे कठीण झाले आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून फेरीबोटीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी एकही पैसा घरी नेता आलेला नाही. कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची वेळ ओढवल्याचे शराफत मुकादम यांनी सांगितले.

* फेऱ्या किती होतात?

भाऊच्या धक्क्यावरून सध्या रेवससाठी १४, तर मोरासाठी १० फेरीबोटी सुटतात. शनिवारी गावी जाणाऱ्या प्रवाशांमुळे फेऱ्या वाढवाव्या लागतात. मोरा बंदरासाठी याआधी दररोज दोन हजार प्रवासी प्रवास करायचे, सध्या ही संख्या ८०० ते ९०० वर स्थिरावली आहे, अशी माहिती भाऊच्या धक्क्यावरील तिकीटमास्तर अनिल कांबळी यांनी दिली.

......................