मुंबई : मुंबईत दिवसभरात ३७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २ लाख ७६ हजार ४१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३६३ दिवसांवर पोहोचला आहे. २९ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईत मंगळवारी ५३९ रुग्ण आणि ९ मृत्यूंची नोंद झाली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ७ जणांना दीर्घकालीन आजार होते. यात ७ रुग्ण पुरुष व २ रुग्ण महिला होत्या. सहा जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते, तर उर्वरित ३ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. शहर उपनगरांत कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ९५ हजार ५२४ झाली असून मृतांची संख्या ११ हजार १४७ झाली आहे. सध्या ७ हजार ९४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये सक्रिय कंटेन्मेंट झोन्स २२५ असून सक्रिय सीलंबद इमारती २ हजार ३४४ आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २८२८ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.