कोरोनामुळे एकाकी विधवेचे घरकाम सुटले, मासिक वेतनासहित एक वेळचे जेवण हिरावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 03:06 PM2020-04-13T15:06:54+5:302020-04-13T15:07:19+5:30

स्वयंसेवी संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या फूड पॅकेटवर गुजराण

Corona relieves lonely widow homework, misses one-time meals with no monthly salary, | कोरोनामुळे एकाकी विधवेचे घरकाम सुटले, मासिक वेतनासहित एक वेळचे जेवण हिरावले

कोरोनामुळे एकाकी विधवेचे घरकाम सुटले, मासिक वेतनासहित एक वेळचे जेवण हिरावले

googlenewsNext

खलील गिरकर

मुंबई : कोरोनामुळे देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. हातावर पोट असलेल्यांना तर भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. घरकाम करणाऱ्या महिलांचे दुःख तर आणखी वेगळे आहे. प्रमिला चौघुले (नावात बदल) ही एकाकी राहणारी विधवा लॉकडाऊनपूर्वी जवळपासच्या काही घरांमध्ये जावून घरकाम करत होती. त्याबदल्यात तिला एकवेळ जेवण मिळत होते व हाती काही पैसे पडत होते. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक सोसायट्यांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आल्याचा फटका या महिलेला देखील बसला. लॉकडाऊनमुळे व कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घरकाम करण्यास येऊ नये असा संदेश घरमालकांनी दिला. त्यामुळे २२ मार्च पासून या महिलेवर घरी बसण्याची वेळ आली आहे. घरकाम बंद झाल्याने मिळणारे वेतन देखील बंद झाले आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे एका घरात या महिलेला घरकाम केल्यानंतर दुपारचे जेवण दिले जात होते. त्यामुळे जेवणावरील खर्च वाचत होता मात्र लॉकडाऊन मुळे हे एकवेळचे जेवण हिरावले गेले आहे.

सध्या काही स्वयंसेवी संस्थांकडून अशा गरजू नागरिकांना फूड पॅकेट पुरवले जातात. परिसरातील काही जणांना या महिलेबाबत  माहिती असल्याने त्या महिलेचे नाव फूड पॅकेटच्या यादीत देण्यात आले. त्यामुळे सध्या त्यांना फूड पॅकेटवर अवलंबून राहावे लागत आहे. जेवणाचा प्रश्न काही अंशी सुटला असला तरी हातातील पैसे खर्च झाल्याने व फारशी बचत नसल्याने त्या महिलेला काही आजारपण उद्भवले तर काय करायचे असा यक्षप्रश्न पडला आहे. शिवाय दोन वेळा फूड पॅकेटद्वारे जेवण मिळत असले तरी घरखर्चासाठी म्हणून काहीही पैसे उरलेले नसल्याने हे लॉकडाऊन व कोरोनाचे संकट कधी एकदाचे दूर होते याची प्रतिक्षा केली जात आहे. ज्या घरांमध्ये ही महिला काम करत होती त्यांनी काही पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे मात्र त्यांच्या घरी जाणे शक्य होत नसल्याने व काम बंद असल्याने ही परिस्थिती नेमकी कधी सुधारणार याकडे त्यांचे डोळे लागले आहेत. ज्या घरांमध्ये ही महिला कामाला जात होती त्यापैकी काही जणांना वेतन मिळालेले नसल्याने त्यांच्याकडून देखील काम केल्याशिवाय वेतन मिळण्याबाबत अनिश्चितता आहे. हा अंधकार लवकरच दूर व्हावा व पूर्वीप्रमाणे सुरळीत जीवन  जगता यावे अशी प्रार्थना केली जात आहे.
 

Web Title: Corona relieves lonely widow homework, misses one-time meals with no monthly salary,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.