लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड राखीव करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या बेडचे शुल्क किती असावे, याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने खासगी रुग्णालयाच्या प्रशासनात संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत खासगी दवाखान्यातील तपासणीचे दर पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णाच्या उपचारासाठी पूर्वीच्या दरापेक्षा कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही.
सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये ‘कोरोनाचा राखीव बेड कितीला?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबई शहरातील खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांसाठी बेड्स राखीव ठेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यासाठी किती दर आकारावे, हे मात्र स्पष्ट करण्यात आले नव्हते. मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याच्या बैठकीत राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ.नितीन आंबाडेकर यांनी स्पष्ट केले की, राज्यात अद्यापही साथरोग कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यातील तपासणीचे दर पूर्वीचेच दर राहणार आहेत. सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याने नागरिक, रुग्णालयांमध्ये वादाचे प्रसंग उभे राहणार नाहीत.
मुंबईत १,०७९ सक्रिय रुग्ण
-सोमवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ७५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. -त्यापैकी १७ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर तीन रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज भासली आहे. -शहरात सध्याच्या घडीला कोरोनाचे १,०७९ सक्रिय रुग्ण आहेत, तर दिवसाला सहाशेपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत.