कोरोनाच्या निर्बंधांमुळे भारतीय जोडप्यांचा विवाह पार पडला अमेरिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:07 AM2021-05-19T04:07:02+5:302021-05-19T04:07:02+5:30

कुटुंबाची ऑनलाइन उपस्थिती, कर्जत तालुक्यातील नवरदेवाच्या लग्नाची गोष्ट नेरळ : कोरोना साथीच्या वावटळींनी दैनंदिन जीवन प्रभावित केलेच आहेत, तर ...

Corona restrictions cause Indian couple to marry in US | कोरोनाच्या निर्बंधांमुळे भारतीय जोडप्यांचा विवाह पार पडला अमेरिकेत

कोरोनाच्या निर्बंधांमुळे भारतीय जोडप्यांचा विवाह पार पडला अमेरिकेत

Next

कुटुंबाची ऑनलाइन उपस्थिती, कर्जत तालुक्यातील नवरदेवाच्या लग्नाची गोष्ट

नेरळ : कोरोना साथीच्या वावटळींनी दैनंदिन जीवन प्रभावित केलेच आहेत, तर अनेकांचे विवाहही खोळंबले आहेत. त्यातल्या काहींनी बँडबाजा, वरातीला बगल देत मोजक्याच वऱ्हाडींच्या उपस्थितीत कसेबसे आपले विवाह उरकून घेतले. अशात कर्जत तालुक्यातील एका नवरदेवाच्या लग्नाची गोष्ट चर्चेत आली आहे. परदेशात असलेल्या वधू आणि वराचे भारतात लग्न ठरले होते. मात्र कोरोनाने वाट अडविल्याने त्यांनी अमेरिकेत लग्न पार पाडले. या लग्नाला ऑनलाइन उपस्थिती लावत वऱ्हाडी मंडळींनी अक्षता टाकत वधूवरांना आशीर्वाद दिले.

कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील रहिवासी असलेले व मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदावर रुजू असलेले अनिल थोरवे यांचा मुलगा अजय आणि त्याची भारतातील केरळ येथील वर्गमैत्रीण श्रीनिधी श्रीनिवास राघवन यांचे सुमारे दीड वर्षांपासून लग्न ठरले होते. अजय व श्रीनिधी या दोघांनी मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेले असून, अमेरिकेमध्येही उच्च शिक्षण घेतले आहे. अजय एनव्हिडिया व श्रीनिधी मायक्रोसॉफ्ट या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत.

कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर २ एप्रिल २०२० रोजी त्यांनी मुंबईमध्ये विवाह समारंभ पार पाडण्याचे ठरवले होते. त्यासाठी हॉटेलदेखील बुक केले होते. मात्र कोरोनामुळे अमेरिकेहून विमानांची वाहतूक बंद झाल्याने त्यांचे लग्न १७ मे रोजी मुंबईत करण्याचे ठरले. परंतु त्यावेळीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विवाह सोहळ्याच्या दुसऱ्या नियोजनावर पाणी फिरविले. कोरोना प्रादुर्भावांमुळे लादलेल्या निर्बंधांनी वाट अडविल्याने दोघांना भारतात यायला जमले नाही. म्हणून दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न अमेरिकेतच करण्याचा निर्णय घेत भारतातून ऑनलाइन हजेरी लावण्याचे निश्चित केले. त्यानुसार सिॲटल येथे अमेरिकेतील तारखेनुसार १६ मे २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता दोघांच्या २० मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने विवाह पार पडला. दोघांच्याही कुटुंबीयांना आनंद झाला असला तरीही त्यांच्या लग्नात प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

.........................................................

Web Title: Corona restrictions cause Indian couple to marry in US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.