कोरोना निर्बंधांमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:30 AM2021-05-06T02:30:40+5:302021-05-06T02:31:06+5:30
वाहतुकीचा खर्च वाढला; भाव मिळेना, ग्राहकांच्या खिशाला मात्र चाट
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातही कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कृषी व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे तर मोठे नुकसान होत आहे. मुंबई, बंगळुरू आदी मोठ्या बाजारपेठांमध्ये भाजीपाला पाठविला तर योग्य भाव मिळत नाही. त्यापेक्षा शेतातील भाजीपाला स्थानिक बाजारपेठांमध्येच विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये आवक घटली आहे. दुसरीकडे किरकोळ विक्रेते ग्राहकांना जादा दराने भाजीपाला विकत आहेत.
दररोज ८०० टन आवक घटली
नवी मुंबई : मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिदिन ३ हजार टन भाजीपाल्याची आवक होते; परंतु सद्य:स्थितीमध्ये २ हजार ते २२०० टनच आवक होत आहे. सरासरी ८०० टन विक्री कमी झाली आहे. मुंबईमध्ये सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, पुणे, सोलापूर परिसरातून जवळपास ६० टक्के भाजीपाला विक्रीसाठी येत आहे.
हॉटेल, मेस बंदमुळे भाजीपाला मातीमोल
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : शहरांमधील हॉटेल, खानावळी (मेस) बंद असल्याने भाजीपाल्याला उठाव नसल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भाव मिळत आहे.
जिल्ह्यात सातारा, सोलापूर, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतून २५ ते २८ हजार क्विंटल शेतीमाल विक्रीसाठी येतो. दर महिन्याला सुमारे ७ कोटीची उलाढाल होते. खेड, आंबेगाव, जुन्नर भागातील शेतकरी भाजीपाला मुंबईला पाठवितात. पुण्याचे मार्केट यार्ड सुरू असले, तरी अनेक निर्बंध आहेत. किरकोळ विक्रेते मात्र अवाच्या सव्वा दर आकारत आहेत.
कोल्हापुरात खरेदी - विक्री सुरळीत
राजाराम लोंढे
कोल्हापूर : भाजीपाल्याची आवक व विक्री यावर जिल्ह्यात दिवसाला सरासरी ३० लाख ४८ हजार रुपयांची उलाढाल होते. कोल्हापूर बाजार समितीत रोज २८०० क्विंटल भाजीपाल्याची आवक होते. बेळगाव, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर येथून आवक होते. किरकोळ बाजारात मात्र भाव दीडपट जादा आहेत. शिरोळ तालुक्यातून दररोज तीनशे टन भाजीपाला मुंबई, वाशी मार्केटकडे पाठविण्यात येतो. मात्र, सकाळी ७ ते ११ या वेळेच्या बंधनामुळे विक्रीला मर्यादा आल्या आहेत. परिणामी भाजीपाला शिल्लक राहत आहे.
वाहतूक खर्च वाढला; दरही मिळेना !
नितीन काळेल
सातारा : वारंवार बसणारा वळवाच्या पावसाचा तडाखा आणि कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे भाजीपाला बाजारपेठेत पोहोचविताना अडचणी येत आहेत. त्यातच वाहतूक खर्चही वाढला आहे. उठाव नाही. त्यामुळे कमी भावात भाज्या विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यातील भाजीपाला साताऱ्याबरोबरच पुणे, मुंबईच्या बाजार समितीत जातो. वाहतूक खर्च वाढला आहे. शिवाय दर मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतच भाजीपाला विकण्यावर भर आहे.
वाहतुकीच्या दरात दुपटीने झाली वाढ
नारायण चव्हाण
सोलापूर येथून वाशी मार्केट आणि हैदराबाद येथे रोज किमान २० ट्रक शेतमाल जातो. वाहतूक व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एरव्ही १० टन मालवाहतुकीसाठी वाशी मार्केटला १७ हजार रुपये घेतले जात होते, आता २५ हजारांवर दर आहेत. मालाला उठाव नसल्याने भाव मिळत नाही.
संचारबंदीमुळे किरकोळ विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ पर्यंतच वेळ देण्यात आली आहे. यामुळे भाजीपाल्याच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. अनेक जणांनी गावाची वाट धरल्यामुळे ग्राहकांची संख्याही कमी झाली आहे.
- शंकर पिंगळे, संचालक,
मुंबई बाजार समिती.
प्रतिकिलो बाजारभाव
वस्तू बाजारभाव आवक (टन)
भेंडी १५ ते ३० १४१
कोबी १० ते १२ १६४
टोमॅटो १० ते २० २३०
गाजर १४ ते ३० १३१
कोथिंबीर १० ते २२ १००
हिरवी मिरची २० ते ४० २२०
शेवगा शेंग १२ ते २० ३२