Join us

कोरोना प्रतिबंंधात्मक निर्बंधांमुळे रिक्षाचे चाक मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:06 AM

दरराेजच्या ५ लाख फेऱ्या कमी; टॅक्सीच्या फेऱ्यांमध्येही ५० हजारांनी घटलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या निर्बंधांमुळे रिक्षा आणि ...

दरराेजच्या ५ लाख फेऱ्या कमी; टॅक्सीच्या फेऱ्यांमध्येही ५० हजारांनी घट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या निर्बंधांमुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या फेऱ्यांत मोठी घट झाली आहे. रिक्षाच्या दररोजच्या ४ ते ५ लाख फेऱ्या, तर टॅक्सीच्या ५० हजार फेऱ्या कमी झाल्या आहेत. मुंबईत रिक्षाच्या दररोज १५ लाख, तर टॅक्सीच्या एक लाख फेऱ्या होतात.

मुंबई ऑटो रिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव म्हणाले की, गेल्या एका आठवड्यात, आम्ही रिक्षाच्या फेऱ्यांमध्ये मोठी घट पाहिली आहे. कारण केवळ दोन प्रवाशांना रिक्षातून प्रवासास परवानगी आहे. लोक खासगी कार्यालयात जाण्यासाठी किंवा खरेदीसाठीही बाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे अनेक मार्गांवरही रिक्षा रिकाम्या धावत आहेत.

तर, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले की, कमी अंतराच्या प्रवासासाठी प्रवासी ऑटो आणि टॅक्सीतून प्रवास करणे टाळत आहेत. काेराेनाच्या वाढत्या संसर्गासाेबतच नुकतीच भाड्यात तीन रुपयांनी झालेली वाढ हेही त्यामागील कारण आहे.

दुसरीकडे निर्बंध अधिक कडक हाेण्याच्या भीतीने वाहनचालकांचा एक गट आपल्या गावी परत जाण्याचा विचार करीत आहे. कोरोनापूर्वीच्या वेळेच्या तुलनेत कमाई कमी झाली आहे. याशिवाय, गेल्या लॉकडाऊनदरम्यान मोठे नुकसान झाले. पुन्हा नुकसान हाेण्याची भीती आहे, अशी खंत एका रिक्षा चालकाने व्यक्त केली.

.................................