Join us

CoronaVirus: वरिष्ठांच्या मनमानीमुळे पोलिसांना कोरोनाचा वाढता धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 11:40 AM

पन्नाशीतील आधिकारी, अंमलदारांना जुंपले नाकाबंदीत : आयुक्तांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

- जमीर काझी 

मुंबई : राज्यातच नव्हे देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रूग्णाचे प्रमाण असलेल्या मुंबई महानगरात आता पोलिसांनाही त्यांचा पादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पन्नाशीच्या घरात पोहचलेले आणि विविध आजाराने ग्रासलेल्या पोलिसांना त्याची लागण होण्याचा धोका वाढला आहे. अपुर्या सुविधासह त्यांना नाकाबंदी व बंदोबस्तामध्ये त्यांना जुंपले जात असल्याने ही भीती वर्तविली जात आहे. 

 विशेष म्हणजे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सूचना डावलून शहर व उपनगरातील उपायुक्त आणि वरिष्ठ निरीक्षक मनमानीकरीत त्यांना ड्युटी लावित आहेत. त्यामुळे संबंधित आधिकारी व अंमलदारांना जीवावर उदार होऊन काम करावे  लागत आहे. शिस्तीच्या बडग्यामुळे त्यांना त्याबाबत तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्रात कोविड-१९ चे सर्वाधिक ५४० वर रूग्ण मुंबईत आढळून येत आहेत. दररोज त्याचे प्रमाण वाढत राहिले असून येत्या काही दिवसात ही संख्या काही हजारात पोहचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याला अटकाव घालण्यासाठी आरोग्य विभाग, प्रशासनाच्याबरोबरच पोलीस यंत्रणा गेल्या महिनाभरापासून युध्दस्तरावर कार्यरत आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर विनाकारण भटकणार्यावर कारवाईचा सपाटा लावला आहे.त्याच बरोबर गरजू, घरात जीवनावश्यक साहित्य, साधनाशिवाय अडकून पडलेल्या   नागरिकांना मदत पोहचविण्यात पोलीस यंत्रणा आघाडीवर आहे.

राज्यात लॉकडाऊन झाल्यापासून पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक रोखण्यासाठी सर्व प्रमुख रस्ते ,चौकातील वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत.त्याचबरोबर नाकाबंदी करून विनाकारण भटकणार्याची वाहने जप्त केली जात आहेत.

शहर व उपनगरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत  रोज नाकाबंदी करण्याचे आयुक्तांचे आदेश आहेत. मात्र त्यामध्ये ४५  वर्षावरील अंमलदार तसेच निरीक्षक दर्जाच्या अधिकारी आणि मधुमेह, रक्तदाब आदी व्याधी असलेल्यांंनानशक्यतो  ही ड्युटी लावू नयेत , त्यांना सुरक्षाबाबतचे योग्य खबरदारी घ्यावी,अत्यावश्यक वेळीच त्यांना बंदोबस्त देण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र त्याकडे डोळेझाक करून संबधितांना बंदोबस्ताला जुंपले जात आहे.त्यामुळे  त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे.दरम्यान,याबाबत पोलीस अायुक्ताचे प्रवक्ते उपायुक्त प्रणय अशोक यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.

------

मुंबईतील एका परिमंडळाचे उपायुक्ताची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असलीतरी ते अद्याप उपचार घेत आहेत तर पश्चिम उपनगरातील एक उपनिरीक्षक ,रेल्वेतील एका अंमलदारला करोनाची लागण झाली.त्याच्या संपर्कात असलेल्या  अधिकारी ,अंमलदारांची चाचणी घेतली असून त्यातील काहींना लागण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

--

सुरक्षा किट कपाटातच

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सोमवारी दहा हजार सुरक्षा किटचे मुंबई पोलिसांना देण्यात आले. मात्र त्याचे वितरण काही पोलीस ठाण्यात करण्यात आले असले तरी अद्याप पोलिसांच्या हाती पडलेले नाही. कपाटातच पडून असल्याचे समजते. मास्कचे आयुष्य ७ तासापर्यत असल्याने त्यानंतर दुसर्या मास्कचे काय ,हा प्रश्न अनुत्तरित आहे, तसेच आयुक्तांनी सर्व अधिकार्यांना हायड्रोक्सी क्लोरोक्विन  (एचसीक्यू) हे औषध घेण्याची सूचना केली आहे. मात्र अधिकार्यांना त्या गोळ्या उपलब्ध करून दिलेल्या नाहीत..

टॅग्स :पोलिसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस