कोरोनामुळे कुंटुंबांची आर्थिक घडी विस्कटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:10 AM2021-08-28T04:10:47+5:302021-08-28T04:10:47+5:30
ओमकार गावंड लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय व उद्योगधंदे ठप्प झाले. तर ...
ओमकार गावंड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय व उद्योगधंदे ठप्प झाले. तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर तर उपासमारीची वेळ आली होती. मुंबई लोकलवर अवलंबून असणाऱ्या डबेवाल्यांच्या व्यवसायालाही धोरणामुळे जोरदार फटका बसला. यामुळे डबेवाल्यांनी आता उदरनिर्वाहासाठी वेगळे पर्याय निवडले आहेत. अनेक डबेवाल्यांनी शेतीसाठी थेट गावची वाट धरली. तर काही डबेवाले हाताला मिळेल ते काम करत आहेत. कुटुंबाला दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून रोहीदास सावंत हा अंधेरीचा डबेवाला रिक्षा चालवत आहे.तर विलास शिंदे हा वर्सोवा येथील डबेवाला आता घरोघरी जाऊन दूध विकत आहे.
रोहीदास सावंत - लोकल प्रवासावरील निर्बंधांमुळे आमचा डबे पोहोचविण्याचा व्यवसायदेखील बंद आहे. उपनगरात राहत असल्यामुळे शहरात दररोज सायकल घेऊन जाणे शक्य नाही. परंतु आता कुटुंबातील ५ सदस्यांना दोन वेळचे अन्न मिळायलाच हवे, म्हणून माझ्या जवळ रिक्षा चालविण्याचा परवाना असल्याने मी दुसऱ्याची रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. रिक्षालाही पूर्वीप्रमाणे व्यवसाय नाही. परंतु माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.
विलास शिंदे - डब्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याने मी घरोघरी जाऊन दूध विकणे सुरू केले. दररोज वर्सोवा ते चर्चगेट सायकलने जाणे शक्य नाही दोन डोस पूर्ण न झाल्याने डबेवाले रेल्वे प्रवास करून आपला व्यवसाय करू शकत नाही. सरकारने या समस्येकडे लक्ष देऊन डबेवाल्यांसाठी विशेष लसीकरण केंद्राची व्यवस्था करायला हवी.