लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन सुरू केले आहे. अनेक क्षेत्रांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातून औद्योगिक क्षेत्राला मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या सुरूही झाल्या आहेत. मात्र, कंपनीला पुरविला जाणारा कच्चा माल आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच बाजारपेठ बंद असल्याने उत्पादन करून माल विक्री करायचा कसा? असा प्रश्न उद्योजकांसमोर निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. मर्यादित मनुष्यबळासह उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मुंबईत अंधेरी येथे औद्योगिक क्षेत्र आहे. संचारबंदीच्या काळात या कंपन्या अल्प मनुष्यबळावर सुरू ठेवण्यात आल्या. परंतु, दुसरीकडे उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ बंद असल्याने उद्योजक अडचणीत आहेत. त्यामुळे उत्पादन करून करायचे काय? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
खर्च भागवणे कठीण
दुसऱ्या बाजूला उद्योग, व्यवसाय सुरू करून त्यातून निघणाऱ्या उत्पन्नातून कर्जाचे हप्ते, वीजबिल भरणा करण्याएवढेही उत्पन्न मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. कंपनी सुरू करण्यासाठी कच्चा माल, स्पेअर पार्ट आदी साहित्य उपलब्ध होत नाही. उद्योग-व्यवसाय जवळपास ठप्प आहेत. त्यातून कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्चही भागविणे शक्य होत नसल्याने उद्योग सुरू असले, तरी या उद्योगांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
प्रतिक्रिया
उद्योग क्षेत्राला कामगारांचा तुटवडा आहे. तसेच कच्चा माल पुरेसा मिळत नाही, त्याचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढत आहे, तर ग्राहक दर वाढवून देत नाहीत. मागणीही कमी झाली आहे. त्याचा फटका उद्योजकांना बसत आहे. मुंबईत एकूण उद्योगांपैकी ५ ते ७ उद्योग सुरू आहेत.
चंद्रकांत साळुंखे, संस्थापक आणि अध्यक्ष, एसएमई चेंबर ऑफ इंडिया
राज्यात लॉकडाऊनमुळे मर्यादित स्वरूपात उद्योग सुरू आहे. मनुष्यबळ कमी असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. विशेषतः आरोग्य क्षेत्राशी संबंधित उत्पादनाची मागणी वाढत आहे. मात्र, पुरवठा कमी आहे. मला एका खाजगी कंपनीची ऑर्डर आली होती, पण कच्चा माल वेळेत न मिळाल्याने ती ऑर्डर पूर्ण करता आली नाही.
मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष डिक्की
कामगारांच्या प्रतिक्रिया
औद्योगिक वसाहत सुरू असली तरी बहुतांश उद्योग ठप्प पडले आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कंपन्या सुरू असल्या तरी तेथे पोहोचायचे कसे? ये-जा कशी करायची?
विवेक नवले
शासनाने औद्योगिक वसाहत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, कच्चा माल मिळत नसल्याने कंपनी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. परिणामी, मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
- मनीष सातपुते
कोरोना संसर्गामुळे वाहतूक ठप्प असल्याने व्यवसाय बंद पडला आहे. मनुष्यबळ उपलब्ध असले तरी कामगारांचे पगारही निघत नाहीत. दोन महिन्यांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नैनेश शर्मा