Join us

ग्रामीण भागात पसरतोय कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 2:45 AM

डहाणू-पालघरमध्ये १० कोरोनाबाधित, कासा उपजिल्हा रुग्णालय सील

पालघर/कासा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना आपले हातपाय विस्तारू लागला आहे. गुरुवारी डहाणू, पालघर तालुक्यांत सापडलेल्या १० कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीने आरोग्य विभागापुढे असलेले आव्हान आता अधिक गडद झाले आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतलेल्या तीन वर्षांच्या मुलीच्या संपर्कात आलेल्या दोन डॉक्टरांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून बुधवारी रात्री उशिरा कासा उपजिल्हा रुग्णालय सील करण्यात आले आहे. या रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह १७६ जणांना रुग्णालयातच ‘क्वारंटाइन’ करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील अनेक गावातून आजही ‘लॉकडाऊन’च्या घोषणेला जनतेकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याने जनतेने आता अधिक काळजी घेणे गरजेचे बनले आहे. मागच्या दोन आठवड्यापासून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. पण बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकदम १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या पॉझिटिव्ह निकालाने समोर आले आहे. डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेत असलेल्या दोन शिकाऊ डॉक्टरांसह काटाळेमधील ५, सफाळेतील १ आणि उसरणीतील २ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.डहाणूच्या गंजाड येथील तीन वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले असताना तिच्या दुसºया तपासणी अहवालात मात्र तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बाब समोर आली आहे. मात्र ती आपल्या कुटुंबियांसह ज्या काटाळेजवळील एका विटभट्टीवर कामाला होते, तेथील काटाळे, लोवरे, वांदिवली, खरशेत या गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयही सील करण्यात आले आहे. उसरणी गावातील एक ५० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या दोन जुळ्या मुली आणि अन्य घरातील नातेवाईकांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला होता.सध्या त्याच उसरणी गावात एक मुलगी व एक इसम असे दोन रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने त्या मृत इसमाशी त्यांचा काही संपर्क झाला होता का? याची चौकशी एडवन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी करीत आहेत. सफाळ्याच्या डोंगरी भागातील एका २४ वर्षीय दुकानदार तरुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा सफाळेवासीय हादरले आहेत. या भागातील सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत.कासा हॉस्पिटल पूर्ण सील केले असून येथील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे नमुने घेण्यात येत आहेत. तसेच ३ ते १४ एप्रिलदरम्यान उपचारासाठी दवाखान्यात आलेल्या रुग्णांची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.- डॉ. संदीप गाडेकर, तालुका आरोग्य अधिकारी, डहाणू

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या