मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. तसेच मुलांच्या शाळेलाही सुट्टी आहे. चाकरमानी गावची वाट धरत आहेत. त्यासाठी एसटीचे १०० टक्के आरक्षण पूर्ण झाले होते. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची अट आहे. एसटी प्रवास बंद झाल्याने चाकरमानी खाजगी ट्रॅव्हल्सचा आधार घेत आहेत. मात्र खासगी ट्रॅव्हल्स दुप्पट तिप्पट भाडे आकारत आहेत.
मुंबई ते चिपळूण, औरंगाबाद, सातारा आदी सर्वच मार्गांवर खासगी बससेवांचे भाडे दुप्पट वाढवण्यात आले आहेत. उन्हाळी सुट्टीत मुंबई व पुणे शहरातून खूप प्रवासी गावी जातात आणि परत येतात. त्याकाळात खासगी प्रवासी बसेसव्दारे मोठ्या प्रमाणात अवाजवी भाडे आकारले जाते. त्याबाबत तक्रारी येत असतात.
सण, सुट्ट्यांच्या हंगामात खासगी बसचालकांकडून जादा दर आकारले जाण्याची तक्रार कायम असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा आहे. अत्यावश्यक सेवेतील २२ जण असतील तरच एसटी जाऊ शकते अन्यथा गाडी रद्द केली. मात्र ज्या प्रवाशांना एसटीने प्रवास करता येत नाही ते खासगी गाड्यांनी गावी जात आहेत.
कालावधीत आकारले जाणाऱ्या तिकिटाच्या तुलनेत सध्याचे भाडे दुप्पट ते तिप्पट झाले आहे. पुढील काही दिवस प्रवाशांना अशाच जादा दरवाढीस सामोरे जावे लागणार आहे.
एसटीने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा आहे. त्यांना अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र आवश्यक आहे. तर सामान्य प्रवाशांना ई पास आवश्यक आहे. पण पुरेशी प्रवासी संख्या नसेल तर गाडी सोडता येत नाही. कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे १०० टक्के आरक्षण झाले होते पण अत्यावश्यक सेवेच्या अटीमुळे ९० टक्के प्रवाशांनी आरक्षणाचा पैसे परत घेतले आहेत.
कोरोना नियमांचे पालन करून एसटीची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात यावी, त्यामुळे एसटी महामंडळाला फायदा होईल, तसेच खाजगी बसचालक कोरोना नियमांचे पालन योग्य रीतीने करत नसून त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका आहे.
श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस
काही कारणास्तव तात्काळ चिपळूणला जावे लागत आहे. पूर्वी ६०० रुपये तिकीट होते मात्र आता १५०० मोजावे लागत आहे. कोरोनाच्या काळात मोठा फटका बसला आहे. मात्र गरज असल्याने एवढे पैसे देण्याशिवाय पर्याय नाही.
प्रदीप आंग्रे, प्रवासी