मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने कोरोना रुग्णाच्या राहत्या भागाची माहिती देणे बंद केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे . कारण कोरोना रुग्णाचा परिसर माहिती झाल्यास पोलीस, नगरसेवकांपासून त्या भागातील रहिवाशांना तसेच शहरातील नागरिकांना खबरदारी घेणे शक्य होते.महापालिका सुरुवातीपासूनच कोरोनाबाबतचा दैनंदिन अहवाल रात्री उशिरा देत असल्याने पालिकेच्या लेटलतीफ कारभाराबद्दल नाराजी आहेच. कोरोनाच्या अहवालात रुग्णाचे वय व त्याचा वास्तव्याचा परिसरही दिला जात होता.
परंतु गेल्या काही दिवसांपासून पालिकेने कोरोना रुग्णाच्या वास्तव्याच्या परिसराची माहिती देणेही बंद केले आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांची तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु परिसराची माहिती मिळत नसल्याने कोरोनाच्या काळजीपोटी आवश्यक खबरदारी घेणाºया नागरिकांची अडचण झाली आहे. कारण कोरोनाचा रुग्ण ज्या परिसरात सापडला तेथील नागरिकांना तसेच त्या भागात ये-जा करणाऱ्यांना अधिक सावधगिरी बाळगणे शक्य होते. नागरिकच नव्हे तर गस्त घालणाºया पोलिसांनाही आता कोरोना रुग्णांच्या परिसराची माहिती नसते. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. स्थानिक नगरसेवकांना माहिती मिळत नसल्याने त्यांचीही अडचण होत आहे.नागरिकांकडून घेतली जाते हरकतरुग्णांची संख्या वाढल्याने परिसराची माहिती तयार करणे व जाहीर करण्यात वेळ जातो. शिवाय ज्या नावाने परिसर परिचित असतो त्या नावाने परिसराची माहिती दिली तर आजूबाजूचे नागरिक हरकत घेण्याचे प्रकारही घडतात म्हणून रुग्णाबरोबरच त्याच्या परिसराची माहिती देणे अवघड होत असल्याचे पालिकेतील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.