कोरोनाने नाडले आता डेंग्यू - मलेरिया पिडतोय (लीड)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:08 AM2021-09-15T04:08:53+5:302021-09-15T04:08:53+5:30
साथीचे आजार बळावले; पण कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला असला ...
साथीचे आजार बळावले; पण कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला असला तरी अद्याप रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. त्याच वेळी मुंबईत डेंग्यू, मलेरिया अशा साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. या आजारांच्या रुग्णांची वाढ प्रामुख्याने भायखळा, वरळी, प्रभादेवी, परळ, धारावी, माहीम, दादर या भागांमध्ये आढळून आली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टो असे साथीचे आजार बळावतात. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू या आजाराचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याची मोहीम महापालिकेच्या कीटकनाशक विभागामार्फत हाती घेण्यात येते. मागील दीड वर्षे मुंबईकर कोरोनारूपी संकटाचा सामना करीत आहेत. त्यात आता मलेरिया, डेंग्यूचा प्रसार रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
ताप, डोकेदुखी आणि खोकल्याची लक्षणे आढळून आल्यावर कोरोना झाल्याच्या भीतीने नागरिक हवालदिल होत आहेत. प्रत्यक्षात चाचणी केल्यानंतर कोरोना नव्हे तर मलेरिया, डेंग्यू झाला असल्याचे समोर येत आहे. दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने असे परिसर मलेरिया व डेंग्यू डासांच्या अळीसाठी उत्पत्तीस्थान बनत आहेत. तर वरळी, प्रभादेवी, परळ या गिरणगाव परिसरात अशा आजाराचा फैलाव अधिक आढळून आला आहे.
पावसाळी आजाराचे रुग्ण
आजार ऑगस्ट सप्टेंबर(१२ तारखेपर्यंत)
मलेरिया ८४८ २१०
लेप्टो ३७ १८
डेंग्यू १४४ ८५
गॅस्ट्रो ३०० ९२
कोट
मलेरिया, डेंग्यू रुग्णांची संख्या यावर्षी नियंत्रणात आहे. या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी पालिकेमार्फत पूर्ण खबरदारी घेतली जाते.
- सुरेश काकाणी (सहायक आयुक्त)
यंदा डेंग्यू मलेरियाच्या रुग्णसंख्येत ३० ते ४० टक्के वाढ होण्याची शक्यता
गेल्या वर्षी कोरोना पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे लोक जास्त घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे पावसाळ्यातील आजारांमध्ये घट दिसून आली. मात्र यंदा निर्बंध शिथिल केल्यानंतर आणि लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा दिल्यानंतर लोकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे यंदा डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येत ३० ते ४० टक्के वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नानावटी मॅक्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसीन अँड इन्फेक्शन डिसीज विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. हर्षद लिमये म्हणाले की, यंदा निर्बंध शिथिल केल्यामुळे जास्त लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ३० ते ४० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.