कोरोना : भर पावसात सुरु आहे संसर्ग झालेल्या लोकवस्तीत सर्वेक्षणाचे कार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 01:59 PM2020-07-16T13:59:24+5:302020-07-16T14:00:04+5:30
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत भर पावसात देखील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या लोकवस्तीत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कार्य सुरू...
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सूर आहे. विशेषतः उपनगरात मोठया प्रमाणावर काम सुरु असून, चाळी, झोपड्या आणि इमारतीमध्ये स्वयंमसेवकांच्या माध्यमातून घरोघरी याबाबतचे सर्वेक्षण सुरु आहे. भर पावसात देखील या कामास ब्रेक लागलेला नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत भर पावसात देखील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या लोकवस्तीत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कार्य सुरू असून, नागरिक देखील यास सहकार्य करत आहेत.
अंधेरीसह जोगेश्वरी पूर्व विभागात कोरोना संसर्गामुळे बाधित होणाऱ्या रुग्णाची संख्या वाढत चालत आहे. जोगेश्वरीतील बहुतांश भाग झोपडपट्टी बहुल असल्यामुळे कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या के पूर्व विभागाच्या अंतर्गत विविध विभागात विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या कोरोनाच्या काळात एन.वाय.के. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लक्ष सामाजिक प्रतिष्ठान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या के पूर्व विभागांतर्गत अनेक स्वयंसेवक दिवसभर कार्य करत आहेत. सारीपुत नगर येथील स्वयंमसेवक भानुदास सकटे व सुनील बोर्डे, विनोद काकडे, निखिल सुतार, अजय साळवे हे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत भर पावसात देखील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या लोकवस्तीत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कार्य सुरू आहे. सध्या एम.आय.डीसी, मालप्पा डोंगरी, सारीपुत नगर, सर्वोदय नगर, शामनगर, अंधेरीतील कनकिया सोसायटी, मुळगाव डोंगरी, सुभाष नगर, कोडींविटा, गणेश वाडी, आंबेडकर नगर या ठिकाणी घरोघरी जाऊन ताप, सर्दी, खोकला, बी पी डायबेटिस अन्य आजाराबाबत माहिती घेत ती नोंद करण्याचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यासह सुरू आहे. येथील रहिवासी सहकार्य देखील करत आहेत.