आपले स्वास्थ्य हे आपल्याच हाती आहे, ही मुख्य शिकवण कोरोनाने दिली. हवामान बदलामुळे ताप, सर्दी होणे हा दरवर्षी ठरलेला नियम! पण कोरोनाकाळात घेतलेल्या दक्षतेमुळे व आरोग्याबद्दल घेतलेल्या खबरदारीमुळे आरोग्याच्या बाबतीत त्याने अधिक सजग व्हायला शिकवले. दरवर्षी ठरलेले आजार आपण मानत आणलं तर टाळू शकतो, ही शिकवण कोरोनाने दिली. दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय कोरोनाने मोडीत काढली. स्वतःची कामे स्वतः करता येणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या काळात झाली. अनिश्चित भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे, बचत करणे यासारख्या गोष्टींकडे कोरोनाने गंभीरपणे पाहण्यास शिकवले.
-श्रुती हरेश काजवे, गोरेगाव, मुंबई.
-------------------------------
शेजारधर्म कसा सांभाळायचा ते शिकवले
कोरोनाने केवळ शिकवलेच नाही तर तसे वागायला भाग पाडले. स्वच्छता, संयम, सहनशीलता, माणुसकी, आर्थिकदृष्ट्या दूरदृष्टी ठेवून नियोजन कस करायचं ते शिकवलं. खरंच कोरोनाने 'न भूतो न भविष्यति' अशी अनुभूती दिली. हे प्रलयंकारी कोरोना संकट मार्चअखेरीस ओढवलं आणि या संकटाची परिणती टाळेबंदीमध्ये झाली. क्षणार्धात जनजीवन एखाद्याने स्टॅच्यू म्हणावं आणि समोरच्याने जिथल्या तिथे थांबावं, तसं थांबलं.
पहाटे ५.३० ला उठून करावी लागणारी मुलांची शाळेची तयारी, डबे, योगा क्लास, रोजचा बाजारहाट हा माझा नित्यनेम एका क्षणात थांबला. जीवनावश्यक असलेला किराणा माल तसेच भाजीपालाही ठरावीक वेळीच मिळत असल्यामुळे वेळेत न गेल्यास काहीच मिळत नव्हतं. बाहेरच्या खाण्याने पैसा तर जातोच; शिवाय आरोग्याचीही हानी असे दुहेरी नुकसान होते याची तीव्रतेने जाणीव झाली.
घरच्या भाजी-भाकरीची किंमत कळली. स्वच्छतेची काळजी घेतली तर इतरही अनेक आजारांना आळा बसतो याचा अनुभव घेतला. सतत घरात असल्यामुळे माझा किती वेळ वाया जातो आणि कुठे जातो याची जाणीव मला झाली. आळस झटकून वेळेचं व्यवस्थित नियोजन केलं तर सारं काही शक्य होतं, हे लक्षात आलं. अडीअडचणीत शेजारी पहिले धावून येतात. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींवरून न भांडता एकमेकांना समजून घेऊन शेजारधर्म सांभाळणं किती गरजेचं आहे, हे कोरोनाने शिकवलं.
- अनघा सावंत, मुंबई